सुकन्या समृध्दी योजना केंद्र सरकारने मुलींच्या नावाने सुरू केलेली योजना आहे. यामध्ये, मुलगी 21 वर्षांची झाल्यावर मॅच्युरिटी रक्कम मिळते. अल्पबचत योजनेतील ही सर्वाधिक व्याज देणारी योजना आहे. ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देते आणि मुलींच्या नावाने सुरू असलेल्या या योजने त (Post Office Saving Scheme) तुमचे पैसे 3 पट वाढण्याची हमी आहे.
‘मुलगी प्रकाशमय पणतीसारखी असते’ असं म्हणत भारत सरकारनं ‘सुकन्या समृद्धी योजना’ आणली आहे. ही लघु बचत योजना खास मुलींसाठी राबविण्यात येत आहे.
मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर या योजनेचा फायदा मुलीला मिळतो. मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी या योजनेचा फायदा होईल, असा उद्देश या योजनेत व्यक्त करण्यात आला आहे. कधीही न चुकवता खातेदारानं या योजनेत पैसे भरत राहिल्यास योजनेची मुदत संपल्यानंतर तब्बल 71 लाख रुपयांपर्यंत परतावा रक्कम (दरवर्षीच्या व्याजदरातील चढउतारानुसार ही रक्कम कमी जास्त होऊ शकते) या योजनेतून मिळू शकते. सध्या या योजनेसाठी 7.6 टक्के व्याज दिले जात आहे. मुदतीनंतर मिळणारी रक्कम कर विरहित असणार आहे.
सुकन्या समृध्दी योजनेचे फायदे काय आहेत? (Sukanya Samriddhi Yojana)
मुलींबाबत समाजाची मानसिकता आजही बदलेली दिसत नाही. ही मानसिकता बदलण्यासाठी आणि मुलींच्या भविष्याचा विचार करून, केंद्र सरकारने 2015 साली जानेवारीत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ धोरण आणले. ‘सुकन्या समृद्धी योजना’ याच धोरणाची एक भाग आहे. मुलींचा आर्थिक भार आई-वडील किंवा पालकांच्या डोक्यावर पडू नये, या उद्देशानं ही योजना अंमलात आणली आहे. मुलींच्या दूरवरच्या भविष्याचा विचार करूनच शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाचा या योजनेत विचार करण्यात आला आहे.
सुकन्या समृध्दी योजनेसाठी कोण पात्र ठरेल? (Sukanya Samriddhi Yojana)
मुलीच्या जन्मानंतर पहिल्या 10 वर्षातच सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडणं बंधनकारक आहे. खातेदार भारताचा नागरिक असणंही आवश्यक असून खातं केवळ मुलीच्या नावानंच उघडलं जाऊ शकतं. एकच पालक किंवा कायदेशीर पालक त्यांच्या मुलीच्या नावे दोन खाती उघडू शकतात. काही अपवादात्मक प्रकरणांमध्येच अपवाद मान्य केले जातील.
सुकन्या समृध्दी योजनेसाठी किती रक्कम गुंतवावी लागेल? (Sukanya Samriddhi Yojana)
सुकन्या समृध्दी योजनेसाठी किमान 250 रुपयांसह खातं उघडता येते. या खात्यात वर्षभरात दीड लाखांपर्यंत रक्कम जमा करता येते. खाते उघडल्यानंतर पुढील 15 वर्षे कधीही न चुकता या खात्यात पैसे भरणे आवश्यक आहे. अकाऊंट उघडल्याच्या 21 वर्षांनंतर योजनेची मुदत संपेल आणि त्याचे पैसे खातेदाराला परत मिळतील.
- जर तुम्ही दर महिन्याला 1,000 रुपये न चुकता भरले, तर मॅच्युरिटीवेळी जवळपास 5 लाख रुपये मिळतील.
- जर तुम्ही 15 वर्षे दर महिन्याला न चुकता 12,500 रुपये भरले, तर मॅच्युरिटीवेळी 71 लाख रुपये मिळतील.
- जर तुम्ही 15 वर्षे न चुकता दरवर्षी 60,000 रुपये भरले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवेळी 28 लाखांहून अधिक रक्कम मिळेल.
सुकन्या समृद्धी योजनेचं खातं कसं उघडायचं? (Sukanya Samriddhi Yojana)
तुमच्या घराच्या जवळील कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडता येऊ शकते. तेथील कर्मचाऱ्याच्या मदतीनं तुम्ही खाते उघडू शकता. खाते उघडण्याआधी तुम्हाला सरकारच्या वेबसाईटवरून त्यासंबंधीचा फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. अर्जातील सर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर आवश्यक ती महत्वाची कागदपत्रे त्याला जोडावी लागतील. ओळखपत्र बंधनकारक आहे. मुलीचा आधार कार्ड, जन्मदाखला पत्ता म्हणून वापरता येईल. ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडल्यानंतर ते पोस्ट ऑफिसकडे सुपूर्द करावी लागतील.
अर्जासोबत खाते उघडण्याची किमान रक्कम द्यावी लागेल. ही रक्कम, रोख, चेक किंवा ड्राफ्टच्या स्वरूपात देता येते. या खात्यात इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातूनही पैसे ट्रान्स्फर करण्याची सुविधा देण्यात आलीय. पोस्ट ऑफिस, खासगी व सार्वजनिक बँकेत यासंबंधी सर्व माहिती उपलब्ध आहे. हे बचत खाते तुमच्या अधिकृत बँकेतही उघडले जाऊ शकते. तसेच, एका बँकेतून दुसऱ्या बँकेत खाते ट्रान्स्फर करता येते, त्यासाठी आवश्यक फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईनही उपलब्ध आहेत.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी अटी आणि नियम काय आहेत? (Sukanya Samriddhi Yojana)
- जर सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात न चुकता किमान रक्कम 250 रुपये डिपॉझिट केली नाही, तर ते खाते ‘डिफॉल्ट अकाऊंट’ म्हणून ग्राह्य धरले जाईल. मात्र, हे अकाऊंट 250 रुपये भरून पुन्हा सक्रिय करता येईल. परंतु यासाठी अधिकचे 50 रुपये भरावे लागतील.
- ज्या मुलीच्या नावाने हे खाते आहे, त्या मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती स्वत: अकाऊंट हाताळू शकते. 18 वर्षांनंतर अकाऊंट मुदती पूर्वी बंदही करता येऊ शकते.
- अत्यंत महत्वाचं आणि तातडीचे कारण असल्यास अकाऊंटमधून आधीही पैसे काढता येऊ शकतात. मात्र, यासाठी काही नेमकी कारणंच ग्राह्य धरली जातील.
- मुदतपूर्व अकाऊंट तेव्हाच बंद करता येईल, जर गंभीर आजाराचं कारण असेल किंवा वैद्यकीय गंभीर कारण असेल.
सुकन्या समृद्धी योजनेच्या अधिक माहितीसाठी 1800 266 6868 या मोफत नंबरवर संपर्क करू शकता. तसेच पोस्ट विभागाच्या इतर बचत योजना जाणून घेण्यासाठी Post Office Saving Scheme या लिकंवर क्लिक करा.