मुंबई | राज्य सरकारने वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण, वाढती लोकसंख्या आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन पोलिस दलात १०,००० नवीन पदे भरण्याचा (Police Bharti 2025) निर्णय घेतला आहे. या भरतीसाठी डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती संकलित करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
राज्यात दरवर्षी १० ते १५ टक्क्यांनी गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे तपासाची गती मंदावली असून पोलिसांवर ताण वाढला आहे. याचा परिणाम म्हणून गृह विभागाने मोठ्या प्रमाणावर पोलिस भरतीचे नियोजन सुरू केले आहे. यासाठी डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त झालेली आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणारी पदे एकत्र करून त्यावर आधारित भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासह नियोजनाची तयारी – Police Bharti 2025
पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व पोलिस आयुक्त आणि ग्रामीण भागातील पोलिस अधीक्षकांना त्यांच्या विभागातील रिक्त पदांची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये आंतरजिल्हा बदल्या, पदोन्नतीसाठी राखीव पदे, प्रतिनियुक्तीवरील पदे आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या रिक्त जागांचा समावेश आहे.
याशिवाय नवीन पोलिस ठाण्यांचे प्रस्तावही विचाराधीन आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर यांसारख्या शहरांमध्ये नवीन पोलिस ठाण्यांची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.
भरती प्रक्रिया पावसाळ्यापूर्वी सुरू होण्याची शक्यता
भरतीचा पहिला टप्पा पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मागील भरती प्रक्रियेत १७,००० पदांसाठी तब्बल १८ लाख अर्ज आले होते. यावेळीदेखील अर्जांची संख्या मोठी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गतीने होण्यासाठी विशेष नियोजन सुरू आहे.
उद्योगक्षेत्रात सुरक्षेची गरज
राज्यातील ३०६ एमआयडीसीमधील उद्योजकांना खंडणीसारख्या प्रकारांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, अनेक औद्योगिक भागांमध्ये पोलिस ठाण्यांचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे उद्योजक आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवीन पोलिस ठाण्यांची उभारणी करणे ही काळाची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.
लवकरच प्रक्रिया सुरू होणार
डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त झालेल्या आणि २०२५ पर्यंत होणाऱ्या रिक्त पदांच्या माहितीच्या आधारे भरतीची प्रक्रिया सुरू केली जाईल. नवीन भरतीसह राज्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याचा आणि पोलिस दलाचे मनुष्यबळ वाढवण्याचा सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. दैनिक सकाळने याबाबत वृत्त दिले आहे.