विशाळगडावर पत्रकारांना धक्काबुक्की! गडावरील वृत्तांकन करण्यास केली मनाई | Vishalgad
कोल्हापूर | विशाळगड (Vishalgad) परिसरात झालेल्या हिंसाचारात समाजकंटक आणि त्यांच्या सुत्रधारांवर कारवाई होणे अपेक्षित असताना पोलीसांनी चक्क पत्रकांरावर लाठीचार्ज केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पत्रकारांवर पोलीस प्रशासनाने दडपशाही करत पत्रकारांना धक्काबुक्की, लाठीचार्ज करून विशाळगड येथे वार्तांकनासाठी जाण्यापासून रोखून धरले.
विशाळगडावरील अतिक्रमण मुक्ती मोहिमेदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर गेल्या तीन दिवसापासून नुकसानग्रस्तांना कोणतीही मदत मिळालेली नव्हती. त्यामुळे इथल्या नागरिकांना दिलासा आणि मदत देण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यासह पदाधिकारी निघाले असता त्यांना पोलिसांनी पांढरेपाणी या ठिकाणी रोखले तर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पोलिसांकडून धक्काबुक्की तसेच पत्रकारांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला. या घटनेमुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांविरोधात संतप्त भावना पाहायला मिळत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी रविवारी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी ‘चलो विशाळगड’ चा नारा दिला होता. तर आणखी काही संघटना या मोहिमेमध्ये सहभागी झाल्या होत्या. यादरम्यान मोठ्या प्रमाणात आलेल्या जमावाकडून मोहिमेला हिंसक वळण लागले.
पोलिसांनी विशाळगडाकडे आंदोलकांना जाऊ न दिल्याने आंदोलकानी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर या गावात जिथे अतिक्रमणाचा कोणताही संबंध नव्हता अशा अनेक घरांना लक्ष्य केले आणि प्रार्थनास्थळासह दुकानांची नासधूस केली. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले होते.
या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीने मदत घेऊन कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी आज सकाळी विशाळगडाकडे रवाना झाले. मात्र सर्वांना पांढरेपाणी या ठिकाणी पोलिसांनी रोखले.
यावेळी शाहूवाडीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, शाहूवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय गेरडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संपर्क साधला आणि 15 जणांचे शिष्टमंडळ जाण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र या वेळी पोलिसांकडून प्रसार माध्यमांना मात्र जबरदस्तीने अडवण्यात आले.