मुंबई | देशातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जातात. याचाच भाग म्हणून प्रधान मंत्री रोजगार मेळाव्याअंतर्गत (PMNAM Mela) 51,000 नव्याने भरती झालेल्या लोकांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. ही नियुक्तीपत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (सोमवारी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली जाणार आहेत.
PMNAM Mela – हा रोजगार मेळा देशभरात 45 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. पीएमओने जारी केलेल्या निवेदनानुसार 51 हजार लोकांना विविध विभागांमध्ये नोकरीसाठी नियुक्ती पत्र दिले जाणार आहे.
गृह मंत्रालयाच्या या रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमांतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), सशस्त्र सीमा बल (SSB), आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो तिबेटीयन बॉर्डर यासारखे विविध सशस्त्र पोलीस दल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) तसेच दिल्ली पोलीस भरती या अंतर्गत नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.
प्रधान मंत्री रोजगार मेळावा काय आहे?
देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी बेरोजगार व सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्या उद्देशानेच भारत सरकारने रोजगार मेळावा सुरू केला आहे.
रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सर्व कर्मचारी आणि नियोक्ते यांना एकाच व्यासपीठावर आमंत्रित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. तुम्हीही बेरोजगार असाल आणि तुम्हालाही रोजगार मिळवायचा असेल तर पीएम रोजगार मेला योजना अंतर्गत अर्ज करून लाभ मिळवू शकता. यासाठी या वर्षाच्या अखेरपर्यत म्हणजे 2023 च्या शेवटपर्यंत अर्ज केले जाऊ शकतात.
ही राष्ट्रीय स्तरावरील भरती आहे जी सरकारी योजनेंतर्गत येते. या अंतर्गत, केंद्रीय सशस्त्र दल अधिकारी, उपनिरीक्षक, हवालदार, निम्न-विभाग लिपिक, लघुलेखक, उच्च अधिकार्यांचे वैयक्तिक सहाय्यक, आयकर निरीक्षक आणि मल्टी-टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते.