पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील रखडलेल्या पदभरतीला (PCMC Recruitment 2023) लवकरच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या सुधारित आकृतिबंधात 16 हजार नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे.
PCMC Recruitment 2023 – सद्यस्थितीत महापालिकेच्या सात हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनावर वर्षाला सुमारे 720 कोटींचा खर्च होत आहे. नवीन जागा भरल्यानंतर हा खर्च सुमारे 1400 कोटींवर पोहोचणार आहे. हा सुधारित आकृतिबंध मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची सध्याच्या घडीला सुमारे 30 लाख लोकसंख्या आहे. त्यामुळे महापालिकेला नागरिकांना मूलभूत सेवा व सुविधा पुरविताना ताण येत आहे. मनुष्यबळ संख्या वाढविण्यासाठी नवीन आकृतिबंध तयार करून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या नियमानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर म्हणजे आस्थापना खर्च एकूण उत्पन्नाच्या 25 टक्क्यांच्या आतच करण्याची अट आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील एक हजार 578 जागा भरण्यासाठी राज्य शासनाने ती अट शिथिल केली आहे.
सध्या प्रत्येक महिन्याला सुमारे 30 ते 40 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. अनेक वर्षे नोकरभरती न झाल्याने मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. महापालिकेमध्ये मंजूर जागा 11 हजार 513 आहेत. यापैकी सद्यस्थितीत 7 हजार 53 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. नोकर भरतीनंतर सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांत सुरळीत व गतिमान पद्धतीने सेवा व सुविधा पुरविणे सुलभ होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
सुधारित आकृतिबंधातील पदे
वर्ग- प्रस्तावित जागा
- वर्ग 1 – 476
- वर्ग 2 – 557
- वर्ग 3 – 8041
- वर्ग 4 – 7764
- एकूण 16 हजार 838