News

पांडुरंगाचा पुनर्जन्म: अन् डॉक्टरांनी मृत घोषित केलेला कसबा बावड्यातील पांडुरंग जिवंत झाला | Pandurang

कोल्हापूर | “देवाचं नामस्मरण करता करता मरण यावं,” असं म्हणणाऱ्या भक्तांसाठी पांडुरंग उलपे (Pandurang) यांच्या आयुष्यात घडलेली ही घटना जणू ईश्वरी संकेतच! कसबा बावड्याती पांडुरंग उलपे यांना पंढरीच्या विठुरायाचा अखंड जप करत असताना, हृदयविकाराचा तीव्र झटका आला. घरातील मंडळींनी तत्काळ त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करून घरी न्यायला सांगितलं.

घरी अंत्यविधीची तयारी सुरू झाली, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. रुग्णवाहिका वाटेत खड्ड्यातून गेली आणि पांडुरंगांच्या शरीरात हालचाल झाली! आशेचा किरण उभा राहिला. नातेवाईकांनी ॲम्बुलन्स थेट रुग्णालयाकडे वळवली. डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली आणि हा क्षण जणू चमत्कार ठरला. पांडुरंग उलपे यांची हृदयाची गती पुन्हा सुरू झाली!

काळ आला होता पण वेळ आली नव्हती!
पांडुरंग उलपे यांना मृत्यूच्या दारातून परत आणणाऱ्या या घटनेनं सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. वारकरी संप्रदायातल्या या निष्ठावंत भक्ताने मृत्यूवर विजय मिळवला होता. दोन दिवसांच्या उपचारांनंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि बुधवारी सकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.

सदेह वैकुंठातून परतलेल्या भक्ताचं स्वागत
पांडुरंगांच्या घरी परतण्याच्या दिवशी, वारकरी संप्रदायाच्या सहकाऱ्यांनी त्यांचं औक्षण करत, फुलांच्या पायघड्या घालून मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. “संत तुकारामांनी सदेह वैकुंठ गमन केलं, पण आमचे पांडुरंग उलटे वैकुंठातून परतले,” अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.

डॉक्टरांचं मत आणि वैज्ञानिक कारणं
डॉक्टरांच्या मते, कधी कधी वैद्यकीय निदानाने व्यक्ती मृत घोषित होते, पण प्रत्यक्षात शरीरातील काही प्रक्रिया थांबलेल्या नसतात. अशा दुर्मिळ घटनांमुळे जीव परत मिळतो. पांडुरंग उलपे यांच्या पुनर्जन्मानं मृत्यूवरही विजय मिळवता येतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

या घटनेनं वारकरी संप्रदायाच्या भक्तांमध्ये श्रद्धा अधिक दृढ झाली आहे. “जिथं भक्ती, तिथं पांडुरंगाची कृपा” हेच सत्य असल्याची प्रचिती यानिमित्तानं अनुभवायला मिळाली, अशी भावना यानिमित्ताने पांडूरंग उलपे यांच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराने व्यक्त केली.

Back to top button