Tuesday, September 26, 2023
HomeBlogपंचगंगा मच्छिंद्री आणि महापूर...

पंचगंगा मच्छिंद्री आणि महापूर…

पुराची कारणे एकमेकावर ढकलली जातील... मग सगळे मिळून पंचगंगेला दोष देतील... पंचगंगा मात्र बर वाईट सारं सोबत घेऊन नेहमीप्रमाणे वाहत राहिल..!

Panchganga Machindri and Mahapur – कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी आज गुरुवारी दुपारी 12:30 वाजता वरील व्हीडीओ दिसते तशी आहे. अजुन मच्छिंद्री झालेली नाही. म्हणजे महापूर नाही. व्हीडीओत नदीच्या पुलाच्या कमानीजवळ जे लांबट आकाराचे काळ्या दगडाचे कठडे दिसतात, त्या कठड्यावरून पाण्याचा प्रवाह वाहू लागला की मच्छिंद्री होते आणि महापुराची स्थिती जाहिर होते. पण अजुन पाणी तीन फुट खाली आहे. पण तोवर शहरात अफवाचे पिक उठले आहे.

वास्तविक राधानगरी धरणाचे सहा दरवाजे उघडणे ही दरवर्षीची परिस्थिती आहे. सहा दरवाजे उघडणे म्हणजे धरण भरले व धरणावर पाण्याचा दाब येऊ नये म्हणून त्यावेळी केलेली खूप मोलाची उपाययोजना आहे. त्यामुळे धरणाचे स्वयंचलित सहा दरवाजे दरवर्षी उघडतातच. पण त्या पाण्याचे अजस्त्र लोट जणू काही यावर्षीच बाहेर पडले असल्याचे भासवत मोबाईलवरून व्हायरल होत आहेत.

वास्तविक या क्षणाला पंचगंगेला महापूरही नाही. कोल्हापुरी भाषेत सांगायच झालं तर अजुन मच्छिंद्री झालेली नाही. हां, इथुन पुढे अतिवृष्ठी होतच राहिली किंवा पंचगंगेचे पाणी कृष्णा नदीत सामावले गेले नाही तर पाणी शहराच्या ठराविक भागात घुसेल. येथे पुराचे पाणी येणार हे माहित असुनही केलेली बांधकामे किंवा त्याचा काही भाग बुडेल. मग नेहमीप्रमाणे ब्ल्यु , रेड, ग्रीन या पूर रेषेची चर्चा सुरु होईल. तज्ञ येतील. पुरग्रस्त भागाची नेतेमंडळी पहाणी करतील. या संकटालाही फोटोची एक संधी म्हणून बघतील. रात्री अपरात्री कधीही साध्या फाळकुटा चा आधार घेऊन पुरात मदतीसाठी सज्ज असलेल्या अव्या, पव्या, पम्या, नित्या, पप्या, दिप्या, शबऱ्या असल्या गल्लीतल्या धाडसी पोरांचा फोटो पेपरात क्वचितच येईल. पण तासभर येऊन मदतीची, पहाणीची चमकोगिरी करणाऱ्यांचे फोटो पद्धतशिर व्हायरल होतील.

पुढे पूर ओसरेल आणि पुढच्या वर्षी पुन्हा पाऊस सुरु झाला की पुररेषा, भराव टाकून केलेली बांधकामे, शिवाजी पूल ते केर्ली पर्यंत नदीच्या काठाने मोठ्मोठी बांधकामे, राधानगरी धरण भरले, मग दरवाजे उघडले, मच्छिंद्री, बास्केट ब्रिज, राजाराम बंधाऱ्या वरचा पूल, चिखली-आंबेवाडीत पाणी, रेडे डोह, बालिंगा पूल, जंयती नाला की नदी? असली चर्चा सुरु होईल. पुराची कारणे एकमेकावर ढकलली जातील. मग सगळेजण मिळून पंचगंगेला दोष देतील. पंचगंगा मात्र बर वाईट सारं सोबत घेऊन नेहमीप्रमाणे वाहत राहिल..

सुधाकर काशीद, वरिष्ठ पत्रकार तरुण भारत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular