भरधाव कारच्या धडकेत बोरवडेतील एकजण जागीच ठार
कोल्हापूर | कोल्हापूर-गारगोटी राज्य मार्गावर भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यु झाला आहे. बोरवडे गावच्या हद्दीत हॉटेल मिनर्वासमोर हा अपघात झाला. भरधाव कारने चालत जाणार्या बोरवडे येथील बाबासो नामदेव कांबळे (वय 52) यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. याची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे.
कांबळे हे सेंट्रिंग व्यावसायिक होते. शुक्रवारी संध्याकाळी काम आटोपल्यानंतर ते खासगी कामानिमित्त मुदाळतिट्टा येथे पायी जाताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ते वीस फूट चारचाकी गाडीसोबत फरफटत गेले.
धडकेमुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक दिगंबर अशोक सूर्यवंशी पळून जात होता. लोकांनी त्याचा पाठलाग करून मुदाळतिट्ट्याजवळ पकडून मुरगूड पोलिसांच्या ताब्यात दिले.
अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्र परिवार यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अधिक तपास मुरगूडचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे, सचिन पाखरे अधिक तपास करत आहेत.