अभिमानास्पद! नेमबाज स्वप्निल कुसाळेची अर्जुन पुरस्कारावर मोहोर, तर कोच दीपाली देशपांडेंना द्रोणाचार्य पुरस्कार | Swapnil Kusale
भारत सरकारने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली असून, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या नेमबाज स्वप्निल कुसाळेला (Swapnil Kusale) यंदाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे, स्वप्निलच्या यशामागे महत्त्वाचा वाटा असलेल्या कोच दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण ठरणार आहे.
स्वप्निल कुसाळे: कोल्हापूरचा सुपुत्र
कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी या छोट्या गावातून आलेल्या स्वप्निलने २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष गटातील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदक जिंकून महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय जोडला. खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक पदक मिळवणारा स्वप्निल हा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे.
कोच दीपाली देशपांडे: मार्गदर्शक ते मातेसमान
स्वप्निलने आपल्या मुलाखतींमध्ये अनेकदा नमूद केले आहे की कोच दीपाली देशपांडे या फक्त त्याच्या मार्गदर्शक नाहीत, तर आईसमान आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच स्वप्निलने ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास केला. त्यांच्या या योगदानाची दखल घेत सरकारने त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
अन्य खेळाडूंचा गौरव
महाराष्ट्राचेच सचिन सर्जेराव खिल्लारी यांनी पॅरा ऑलिम्पिकमधील एफ ४६ प्रकारात गोळाफेकीत रौप्य पदक पटकावले आहे. स्वप्निल कुसाळे आणि सचिन खिल्लारी यांना १७ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
खेलरत्न पुरस्कार विजेते
यंदा मानाचा खेलरत्न पुरस्कार नेमबाज मनू भाकर, बुद्धिबळपटू डी. गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह, आणि पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीणकुमार यांना जाहीर झाला आहे. मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर आणि २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात दोन कांस्यपदके जिंकत इतिहास रचला आहे.
पुरस्कार वितरणाचा सोहळा
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा १७ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. या पुरस्कारांसह विजेत्यांना प्रशस्तीपत्र, मानचिन्ह, आणि रोख रक्कम प्रदान करण्यात येईल.