मुंबई | कोरोना काळापासून आरोग्य क्षेत्राचे महत्व फारच वाढले. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात नोकऱ्यांची (Nursing Career) आणि काम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागलीय. आरोग्य क्षेत्रात सध्याच्या घडीला सर्वाधिक नोकऱ्या मिळणारे पद म्हणजेच नर्सिंग असून, आज आम्ही आपल्याला ‘नर्सिंग’ करिअर विषयी सविस्तर माहिती देणार आहोत.
परिचारिका/परिचर अर्थात नर्स होण्यासाठी सेवा आणि समर्पण या गुणांसोबतच नर्सिंगशी (Nursing Career) संबंधित अभ्यासक्रमही करणे आवश्यक आहे. नर्सिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप आणि ट्रेनिंगच्या मदतीने या करिअरशी संबंधित व्यावहारिक गोष्टींची चांगली माहिती मिळवता येते.
नर्सिंग करिअरची सुरुवात कशी करावी (Nursing course information)
- ऑक्झिलरी नर्स मिडवाइफ/हेल्थ वर्कर (एएनएम) कोर्स (नर्सिंग कोर्स) करता येईल. या पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी दीड वर्षांचा असून किमान पात्रता दहावी उत्तीर्ण आहे.
- साडेतीन वर्षांचा जनरल नर्स मिडवाइफरी (GNM) कोर्सही करू शकता. त्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात 40 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- नर्सिंगमध्ये ग्रॅज्युएशनही करता येते. यासाठी किमान पात्रता 45 टक्के गुणांसह इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात बारावी उत्तीर्ण अशी आहे. यासाठी तुमचे वय किमान 17 वर्षे असणे आवश्यक आहे.
नर्सिंगसाठी फी?
जर तुम्हाला चांगल्या मान्यताप्राप्त महाविद्यालयातून नर्सिंगमध्ये डिप्लोमा करायचा असेल तर तुम्हाला ₹ 20000 ते 95000 पर्यंत वार्षिक शुल्क भरावे लागेल. डिप्लोमाचे शुल्कही कॉलेजमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयानुसार असते. तर पदवीसाठी फी वेगवेगळी असू शकते.
BSC नर्सिंग कोर्ससाठी खासगी संस्था वार्षिक शुल्क 40 हजार ते 1 लाख 80 हजारपर्यंत आकारतात. येथे GNM कोर्सची फी 45 हजार ते 1 लाख 40 हजारपर्यंत आहे. सरकारी महाविद्यालयांमध्ये फी कमी आहे.
ज्यांना जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीचा कोणताही अनुभव नाही, ते भारतीय नर्सिंग कौन्सिलमधून किमान 6 ते 9 महिने नर्सिंगमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम करू शकतात.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर येथे मिळतात नोकरीच्या संधी
नर्सिंगचे शिक्षण घेतल्यानंतर, सरकारी किंवा खासगी रुग्णालये, नर्सिंग होम, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आरोग्य गृह, इतर विविध उद्योग आणि संरक्षण सेवांमध्ये प्रशिक्षित नर्सेससाठी मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी आहेत. त्याचबरोबर परदेशातही भारतीय परिचारिकांची मागणी वाढत आहे. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड आणि मध्य-पूर्व देशांमध्ये नोकरी केलेल्या नर्सना जास्त पगार मिळतो.
परदेशात उच्चशिक्षित परिचारिकांची खूप मागणी आहे. बऱ्याच देशांमध्ये नर्स पुरवठा करणारा भारत सर्वांत मोठा देश बनला आहे. चांगल्या पैशाच्या आणि चांगल्या राहणीमानाच्या सुविधांमुळे अनुभवी भारतीय परिचारिका परदेशात जाऊन स्थिरावू लागल्या आहेत.
किती मिळतो पगार
– मुख्य नर्सिंग सेवा – 4 LPA
– नर्सिंग असिस्टंट- 2.5 LPA
– सामुदायिक आरोग्य परिचारिका- 3.5 LPA
– आपत्कालीन परिचारिका – 2 LPA
– नर्सिंग इन्चार्ज असिस्टंट – 2 LPA
– नर्सिंग इन्चार्ज – 3 LPA
भारतीय संरक्षण दलात देखील मिळते संधी
भारतीय संरक्षण सेवांद्वारे घेतलेल्या बीएस्सी (नर्सिंग) कोर्ससाठी 17 ते 24 वर्षांच्या महिलांची निवड केली जाते. येथे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयातील 45 टक्के गुणांसह किमान पात्रता बारावी आहे. अर्जदाराला लेखी परीक्षा देखील पास करावी लागेल. तो शारीरिकदृष्ट्याही तंदुरुस्त असावा. निवडलेल्या लोकांना संरक्षण सेवांसाठी पाच वर्षांचा करार करावा लागेल.
शिष्यवृत्ती
बऱ्याच संस्था पात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती देतात. शिष्यवृत्ती आणि त्याचा कालावधी वेगवेगळ्या संस्थांमध्ये भिन्न असतो. शिष्यवृत्ती मिळाल्यास शैक्षणिक खर्च भागवण्यास मदत होते.
नर्सिंगच्या मूलभूत कोर्सशिवाय तुम्ही पोस्ट-बेसिक स्पेशालिटी (एक वर्षाचा डिप्लोमा) कोर्स घेऊन खालील क्षेत्रातही तज्ज्ञ होऊ शकता
- कार्डियाक थोरॅकिक नर्सिंग
- क्रिटिकल-केअर नर्सिंग
- इमर्जन्सी आणि डिजास्टर नर्सिंग
- नवजात बाळाची काळजी (नियो-नेटल नर्सिंग)
- न्यूरोलॉजिकल रुग्णांची काळजी (न्यूरो नर्सिंग)
- नर्सिंग शिक्षण आणि प्रशासन
- कर्करोगसंबंधी नर्सिंग (ऑन्कोलॉजी नर्सिंग)
- ऑपरेशन रूम नर्सिंग
- विकलांग चिकित्सा नर्सिंग
- मिडवायफरी प्रॅक्टिशनर
- मनोरुग्ण नर्सिंग (सायकॅट्रिक नर्सिंग)
एकूणच आरोग्याप्रती वाढत्या जागरूकतेमुळे या क्षेत्रात पूर्वीपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आज अधिकाधिक रुग्णालये आणि नर्सिंग होमची स्थापना केली जात आहे. तसेच सरकारी पातळीवरही नर्सिंग क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस मागणी वाढणाऱ्या आणि रोजगाराची चांगली संधी देणाऱ्या या क्षेत्रात नक्कीच करिअर करणे फायद्याचे ठरणारे आहे.