आता दाखले काढण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही, अधिकारीच घरी येऊन दाखले काढून देणार!
कोल्हापूर | विविध शासकीय तसेच इतर कामांसाठी लागणारे जात, उत्पन्न, रहिवास आदींसह विविध दाखले नागरिकांना आता घरातच मिळणार आहेत. याबाबतचा पथदर्शी प्रकल्प कोल्हापुरात राबविला जाणार आहे. येत्या 15 ऑगस्टपासून याचा प्रारंभ होणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे.
विविध योजना, प्रवेशासह शासकीय कामकाजासाठी विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता असते. अशा दाखल्यांबाबतच्या आवश्यक सेवा नागरिकांना वेळेत मिळाव्यात याकरिता ऑनलाईन पद्धतीने आपले सरकार, सेतू केंद्रे आदी सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. दरवर्षी त्याची संख्या वाढत आहे. मात्र, त्या प्रमाणात नागरिकांना मिळणार्या सुविधा अधिक सुलभ होताना दिसत नाही. याउलट दाखले वेळेत मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच यामध्ये वेळेच्या अपव्ययाबरोबर खिशाला मोठी कात्री लागते.
हीच बाब ध्यानात घेत प्रशासनाने, ऑनलाईन पद्धतीने दिल्या जाणार्या सुविधा आता घरातच देण्याचा विचार केला आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. विधानसभा अधिवेशनात याबाबत चर्चा झाली असून त्यानुसार हा प्रकल्प कोल्हापुरात राबविण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने याबाबतची तयारी सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी संगणक प्रणाली तयार करण्यात येत असून नागरिकांना घरात कशा पध्दतीने सेवा देता येईल, यादृष्टीने यंत्रणा तयारी करीत आहे. या प्रकल्पांतर्गत नागरिकांना दाखल्याची मागणी करता येईल. यानंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांना आवश्यक असलेल्या दाखल्याची प्रक्रिया राबविली जाईल. यानंतर दाखला मिळाल्यानंतर संबंधिताला तो घरीच उपलब्ध करून दिला जाईल. त्यानुसार प्रकल्पाची रचना तयार केली जात आहे. हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी ठरला तर तो संपूर्ण राज्यात राबविला जाणार आहे.
पूर्वीपासून ऑनलाईन पध्दतीने घरातूनच दाखले काढण्याची सुविधा
घरातूनच दाखला काढण्याची सध्याही सुविधा आहे. राज्य शासनाच्या पोर्टलवर नागरिकांना घरबसल्या अर्ज करून दाखले काढता येतात. यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून दाखले मिळवता येतात. मात्र याबाबत व्यापक जनजागृती झालेली नाही. परिणामी या सुविधेचा वापर राज्यात म्हणावा तसा वाढलेला दिसत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र हे प्रमाण 10 टक्क्यांपर्यंत आहे. यावर्षी सुमारे 90 हजार दाखले नागरिकांनी स्वत: घरातून काढले आहेत. यामुळे याबाबतही व्यापक जनजागृती जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार आहे.