गगनबावडा डेपोला दिवाळीपर्यंत नव्या बसेस मिळणार; विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांची माहिती
कोल्हापूर | कोल्हापूर विभागात जुन्या एसटी बसमुळे निर्माण झालेली समस्या लवकरच दूर होणार आहे. विभागास २३० नव्या बस मंजूर झाल्या असून, यातून गगनबावडा (Gaganbawda), संभाजीनगर आणि मलकापूर आगाराला प्राधान्य देण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत या बसची पूर्तता होण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रवासी विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी दिली.
गगनबावडा तालुक्यातील स्थानिक प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांनाही या नव्या बसचा लाभ मिळणार आहे. गगनबावडा आगारात आयोजित प्रवासी दिन कार्यक्रमात बोलताना बोगरे यांनी ही माहिती दिली आहे.
गगनबावड्यातील प्रवाशांच्या समस्या:
कोरोना काळ आणि एसटी कर्मचारी संपामुळे गगनबावडा आगाराचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले आहे. तळकोकण, गगनबावडा-कोल्हापूर आणि गगनबावडा धुंदवडे खोरीमार्गे कोल्हापूर या मार्गावरील अनियमित एसटीच्या फेऱ्यांमुळे प्रवाशांना मोठी अडचण येत आहे. याबाबत स्थानिक शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन योग्य तो बदल करण्याची मागणी केली.
एसटी आगारातर्फे आयोजित केलेल्या प्रवासी दिन कार्यक्रमात सरपंच मानसी कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक आगार व्यवस्थापक सुरेश शिंगाडे यांनी केले. यावेळी कामगार अधिकारी संदीप भोसले, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक वडगावे, विश्वनाथ पोतदार, गणपती भांबुरे, सुनील मरगज, राजेंद्र मसूरकर, महंमद वडगावे, गुरुनाथ कांबळे, जावेद अत्तार, सतीश दळवी आदी उपस्थित होते. सहायक वाहतूक नियंत्रक मारुती पाटील यांनी सूत्रसंचलन केले. पांडुरंग सरनोबत यांनी आभार मानले.