अजितदादांना परत पक्षात घेण्यावर शरद पवार म्हणाले, “कुटुंब वेगळं होत नाही”, राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता | Sharad Pawar
विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागल्याने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत जाण्यास अनेक जण इच्छूक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच आता अजित पवार यांच्या घरवापसीबाबतही शरद पवार यांनी सकारात्मक विधान केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. यानंतर आता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अजित पवार यांनी राज्यभरात दौरे करण्याची योजना आखली असून, बारामतीत जाहीर सभा घेत आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे म्हटले जात आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी त्यांच्या गटातील इन्कमिंगबाबत भाष्य करताना अजित पवार यांच्याबाबत सूचक विधान केले आहे.
अजितदादांसाठी घरात जागा आहे का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, घरात सर्वांनाच जागा आहे. अजित पवार राष्ट्रवादीतून वेगळे झाले असले तरी ते कुटुंबाचा भाग आहेतच. कुटुंब कधी वेगळे होत नाही. पक्षात मी व्यक्तिगत निर्णय घेणार नाही. त्यांना पक्षात पुन्हा यायचे असेल तर मला आधी पक्षाला विचारावे लागेल. कारण फुटीनंतर ज्यांनी संघर्षाचा काळ अनुभवला त्यांचे म्हणणे काय आहे? याला जास्त महत्व आहे. तरीही ही जर तरची गोष्ट आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार महायुतीत आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. त्याकडे कसं बघता, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. मात्र \’तो महायुतीच्या लोकांचा प्रश्न आहे. आजच्या पेपरला बातमी वाचली. विवेक नावाचं साप्ताहिक आहे. त्यात ही बातमी आहे. त्या आधी ऑर्गनायझरमध्येही अशीच बातमी होती. विवेक आणि ऑर्गनायझरची विचारधारा कोणती? याचा शोध घ्यावा लागेल. यात ते छापून आलंय याचा अर्थ त्यांच्यात अस्वस्थता आहे, असं म्हणायला हरकत नाही,’ असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी पक्षासोबत मैत्री करण्याची ऑफर दिली आहे. अजित पवारांचा गट ते आम्हाला वापरत आहेत, असे म्हणत आहे. वंचितकडे जातो असे सांगत आहेत. आम्हाला थांबवायचे असेल तर सीट वाढवा असे सांगत आहे. अजित पवार यांनी बाहेर पडावे. त्यांचे राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो, असे मोठे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
एकूणच लोकसभा निवडणूकीत अजित पवार गटाला निराशाजनक पराभवाला सामोरं जावं लागल्यानं अनेक नेत्यांची शरद पवार गटात घरवापसी सुरू आहे. यातच छगन भुजबळ हेही महायुतीत नाखुश असल्याने त्यांचा कोंडमारा होत असल्याच्या वारंवार बातम्या येत आहेत. त्यातच आता अजित पवार यांच्याबद्दलही चर्चा सुरू झाल्याने येत्या काळात राज्याच्या राजकारणात वेगळं चित्र पहायला मिळू शकत अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय.