नाशिक | नाशिक विभागात लवकरच तब्बल 8 हजार शिक्षक पदांची भरती (Nashik Teacher Recruitment 2023) केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बी.एड. आणि डी. एड. झालेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी असणार आहे.
येत्या महिनाभरात संचमान्यतेनंतर किमान साडेसात ते आठ हजार जागा नाशिक विभागात रिक्त होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे बी.एड. व डी.एड. करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी वाढणार आहेत. अनेक वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे.
पवित्र पोर्टल 2017 पासून लागू झाल्यानंतर शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे अनुदानित शाळेतील शिक्षकांवर कामाचा मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. इंग्रजी माध्यमाकडे मुलांचा शिकण्याचा कल असल्यामुळे अनेक तुकड्या सध्या कमी होत आहेत. शिवाय लाखोने डी. एड. व बी. एड. झालेले भावी शिक्षक सध्या नोकरीच्या प्रतीक्षेत आहे.
नाशिक विभागात येणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये किमान आठ हजार जागा रिक्त होतील, असा अंदाज शिक्षण उपसंचालकांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेसह खासगी शिक्षण संस्थांच्या प्राथमिक विभागात जागा रिक्त होण्याचे प्रमाण अधिक आहे, तर माध्यमिक स्तरावर मध्यम आहे. निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या जागी अनेक संस्थांनी मानधन तत्त्वावर शिक्षक भरले आहेत.