मुंबई | राज्य सुरक्षा महामंडळामार्फत मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती (Mumbai Police Recruitment 2023) करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. राज्य सुरक्षा महामंडळाने 3 हजार सुरक्षा रक्षक 28 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र सुरक्षा दलाकडून पुरविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी सुरक्षा रक्षकांची नोंदणी व नेमणूक प्रक्रिया 25 ते 27 सप्टेंबर 2023 दरम्यान करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे.
राज्य सरकारी सेवेत कंत्राटी भरतीवरून वाद चालू आहे. अशातच राज्याच्या गृह खात्याने आता पोलिस दलातही कंत्राटी भरतीची प्रक्रिया चालू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीतजास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने पोलिस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. पोलिस दलासाठी शिपाई ते सहाय्यक निरीक्षक यांची 40 हजार 623 पदे मंजूर केली आहेत. त्यापैकी दहा हजार पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामकाजात अडचणी येत आहेत.