Govt. SchemeAgriculture

कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित; जिल्ह्यात २००६ शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा | Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana

कोल्हापूर | शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० (Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana) राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यातील दुसरा प्रकल्प हातकणंगले तालुक्यातील किणी येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पातून १२१६ शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. जिल्ह्यातील पहिला प्रकल्प हरोली (ता. शिरोळ) येथे यापूर्वीच कार्यान्वित झाला असून त्यातून ७९० शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतीला दिवसा वीज पुरवठा मिळणाऱ्या शेतकऱ्यांची एकूण संख्या २००६ झाली आहे.

राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून जिल्ह्यातील दुसरा दोन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प हातकणंगले तालुक्यात कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे महावितरणच्या ११ केव्ही भादोले व ११ केव्ही घुणकी या कृषी वाहिन्यांवर असलेल्या वाठार, किणी व घुणकी या गावांतील १२१६ शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरु झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ५३ प्रकल्प प्रस्तावित

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ५३ ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांची एकूण स्थापित क्षमता १७० मेगावॅट आहे. या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ४८ कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारी देखील दूर होणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे.

सौर प्रकल्प उभारणीत जिल्हा प्रशासनाचे सहकार्य – Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात जमीन उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे व त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय टीमचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. जिल्ह्यातील गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद व भूमी अभिलेख कार्यालय यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे.

सौर प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य करा – महावितरण

वीज ग्राहक व शेतकरी या सर्वांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प हे फायद्याचे असून यामुळे शेतीकरता दिवसा वीज मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात विजेचे दर कमी होण्यासही हातभार लागणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीनी या पर्यावरणपूरक विकास कामात आपला सहभाग नोंदवावा. तसेच या प्रकल्पास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रकल्प सुरु झाल्या पासून पहिले तीन वर्षे पाच लाख अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या जागांवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी सबंधित ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button