\’मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण\’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना, जाणून घ्या सविस्तर | Mukhyamantri Ladki Bahin Yojana
कोल्हापूर | महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी लाभार्थी महिलांच्या नोंदणीचे काम कोल्हापूर जिल्ह्यात गतीने सुरु असून पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
राज्यात कोल्हापूर जिल्हा अर्ज नोंदणीत आघाडीवर
कोल्हापूर जिल्ह्यात 1 लाख 56 हजार 27 अर्ज ऑफलाइन प्राप्त झाले आहेत, यापैकी 57 हजार 831 अर्ज भरले आहेत. राज्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असून याबाबत जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाकडून परिपत्रकातून काही बाबी सोप्या करुन त्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये या योजनेसाठी पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले, मुली अशी कुटुंबाची व्याखा करण्यात आली आहे. कुटुंब याचा अर्थ नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. याशिवाय महिलेच्या पतीचे १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड व १५ वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येईल. योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरले जाईल. योजनेतंर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख व सिटी मिशन मॅनेजर (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पीएफएमएस-डीबीटी (PFMS-DBT) प्रणालीव्दारे देण्याची प्रक्रिया कार्यान्चित केली आहे. केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांमधील (उदा.PM-KISAN, POSHAN, MGNREGS, PM-Svanidhi, JSY, PMMVY व अन्य तत्सम योजना) जे लाभार्थी \”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण\” या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील, त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे केवायसी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने लाभार्थ्यांचा केवळ ऑफलाईन अर्ज भरुन घेवून \”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण\” या योजनेचा थेट लाभ देण्यात येणार आहे. मात्र, हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून योजनेचा अर्ज भरुन घेण्यात येईल.
गावपातळीवर ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची \”ग्रामस्तरीय समिती\” स्थापन करण्यात येवून या समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीने या योजनेसाठी गावपातळीवर शिबिर आयोजित करुन त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने लाभार्थ्यांची नोंदणी करायची आहे.
ऑफलाईन अर्ज यथावकाश अॅप, पोर्टलवर भरण्यात येणार आहेत.
ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात येईल. ही यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिध्द करण्यात येईल. प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण केले जाईल. तसेच यात व्दिरुक्ती (Duplication) टाळण्यात येईल.
5 जुलै 2024 च्या शासन निर्णयान्वये \”मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण\” योजनेच्या अंमलबजावणीसाठी \”अ+\”, \”अ\” व \”ब\” वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्ड स्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरीता \”तालुकास्तरीय समिती\” ऐवजी \”वार्ड स्तरीय समिती\” गठीत करण्यात आली आहे. ही समिती आता \”अ+\”, \”अ\” व \”ब\” वर्ग महानगरपालिकांपुरती मर्यादीत न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात यावी. तसेच तालुका, वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करुन लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द करावी. जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवावे, असे शासन निर्णयात नमुद केले आहे.
नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि ऑनलाईन अॅप, पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर (Successful online updation for beneficiary) 50 रु. याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.