Tuesday, October 3, 2023
HomeNewsMPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणी मित्र राहुल हंडोरेला अटक, 'त्याला मारून...

MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणी मित्र राहुल हंडोरेला अटक, ‘त्याला मारून टाका’ दर्शना पवारच्या आईची मागणी | Darshana Pawar Murder Case

पुणे | एमपीएससी टॉपर दर्शना पवार हिच्या हत्या प्रकरणी (Darshana Pawar Murder case) पुणे ग्रामीण पोलिसांनी तिचा मित्र राहुल हंडोरेला अखेर अटक केली आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी चार दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरत असलेल्या राहुलला अखेर मुंबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केली आहे. लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चार दिवसांनी त्याला अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

राहुल हंडोरेला अटक झाल्याची माहिती मिळताच तिच्या कुटुंबीयांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘आरोपी राहुल हांडोरेला आधी आमच्या ताब्यात द्या. नाही तर त्याला मारून टाका’, असा टाहोच तिच्या कुटुंबीयांनी फोडला आहे. ‘माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे त्याचे करू द्या. मला माझ्या मुलीला न्याय द्यायचा आहे आणि तो मीच देवू शकते. माझी मुलगी गेलीय. तशा इतरांच्या मुली ‌जावू नये. आरोपीला आमच्या ताब्यात द्या नाहीतर फाशी द्या’, अशी संतप्त प्रतिक्रिया दर्शनाच्या आईने दिली आहे.

दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे एकमेकांचे दूरचे नातेवाईक आहेत. गेली अनेक वर्ष ते एकमेकांना ओळखतात. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. परंतु नात्यात असल्यामुळे पवार कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. घरच्यांनी तिचं इतरत्र लग्न ठरवलं होतं. दर्शनाने नुकतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण केली. तर दुसरीकडे राहुल मात्र परीक्षेत अपयशी झाला होता.

लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याच्या रागातूनच राहुलने दर्शनाची हत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. आज दुपारी पुण्याचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल पत्रकार परिषद घेऊन याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत.

नेमक प्रकरण काय?

दर्शना पवार ही राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवडही झाली होती. पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी नऊ जून रोजी ती पुण्यात आली होती. नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे ती राहिली होती. १२ जून रोजी सिंहगडावर जायचे आहे, असं मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली होती.

दरम्यान दर्शनाने कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली होती. तिच्यासोबत मित्र राहुल हंडोरे होता. १२ जूनला तिच्या कुटुंबीयांनी संपर्क साधल्यावर मात्र तिचा मोबाइल बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलिसांत दिली होती. दुसरीकडे, राहुल हंडोरे देखील बेपत्ता असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनीही तो बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलिस ठाण्यात दिली होती.

दर्शना आणि राहुल १२ जून रोजी दुचाकीवरून वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ला परिसरात गेले. सकाळी सव्वासहाच्या सुमारास दोघे जण गडाच्या पायथ्याशी पोहोचले. दोघांनी गड चढायला सुरुवात केली. सकाळी दहाच्या सुमारास राहुल गडावरून एकटाच खाली आला. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणातून ही माहिती उपलब्ध झाली आहे. तेव्हापासून राहुल हांडोरे गायब होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular