Sunday, September 24, 2023
HomeCareerMPSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची आता आणखी एक 'परीक्षा' |...

MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची आता आणखी एक ‘परीक्षा’ | Mpsc Recruitment 2023

मुंबई | MPSC उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी असून वैद्यकीय पात्रतेच्या आधारे उमेदवारांची पात्रता-अपात्रता विचारात घेण्याचा निर्णय (Mpsc Recruitment 2023) घेण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. या वैद्यकीय पात्रतेच्या आधारे उमेदवारांची पात्रता-अपात्रता विचारात घेऊन शिफारसपात्र उमेदवारांची निवडयादी तयार केली जाणार आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही वर्षांपासून अंतिम निकालाद्वारे शिफारस केलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत होती. मात्र, उमेदवारांच्या शिफारशीनंतर नियुक्तीच्या वेळी वैद्यकीय तपासणीमध्ये उमेदवार शिफारसपात्र पदासाठी अपात्र ठरल्यास उमेदवाराची अन्य पदावर निवड होऊ शकत नसल्याचे समोर येत होते. त्याचप्रमाणे अन्य पदासाठी आवश्यक गुण असूनही उमेदवार निवड प्रक्रियेतून बाद ठरत असल्याचे स्पष्ट होत होते. (Mpsc Recruitment 2023)

यावर उपाय म्हणून राज्यसेवा परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी निवड झालेल्या सर्व उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करून आलेला वैद्यकीय अहवाल आणि उमेदवारांनी दिलेला पदांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन अंतिम शिफारस करणे शक्य होण्यासाठी वैद्यकीय चाचणी संदर्भातील कार्यपद्धती बदलण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. (Mpsc Recruitment 2023)

मुलाखतीपूर्वी उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केल्यापासून नियुक्ती देण्याचा कालावधी एक वर्षापेक्षा जास्त झाल्यास शिफारसपात्र उमेदवारांची नियुक्तीपूर्वी पुन्हा वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असेल, असे नमूद करण्यात आले आहे. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना एमपीएससीकडून वैद्यकीय चाचणीसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी पुरेशी विभागीय वैद्यकीय मंडळे स्थापन करून वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात येईल. त्यासाठी एमपीएससीकडून सूचनांसह वैद्यकीय तपासणीपत्र ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांना देण्यात येईल, असे निर्णयात सांगण्यात आले आहे.

वैद्यकीय तपासणीनंतरच्या अहवालावर उमेदवाराला दाद मागायची असल्यास त्यासाठी एमपीएससीकडून सात दिवसांचा कालावधी उपलब्ध करून दिला जाईल. दाद मागण्यासाठी उमेदवाराच्या खात्यात अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची सुविधा असेल. मुंबईतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात अपिलीय वैद्यकीय मंडळाची सरकारकडून स्थापना करण्यात येईल. वैद्यकीय तपासणी अहवालावर दाद मागितलेल्या उमेदवारांना मंडळासमोर तपासणीसाठी बोलवण्यात येईल. त्यानंतर विभागीय वैद्यकीय मंडळ आणि अपिलीय मंडळाने सादर केलेला वैद्यकीय तपासणी अहवाल विचारात घेऊन, उमेदवार पात्र असणाऱ्या संवर्गात वैद्यकीय, शारीरिक आणि शैक्षणिक निकषानुसार सबंधित संवर्गासाठी उमेदवाराला पसंतीक्रम सादर करण्याची मुभा एमपीएससीकडून देण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular