कोल्हापूर: पोटच्या दोन्ही मुलांचा एकाचवेळी दुर्दैवी मृत्यू, विरह सहन न झाल्याने आईनेही सोडले प्राण | Kolhapur News
कोल्हापूर | एकाचवेळी दोन्ही कर्त्या तरूण मुलांचा मृत्यू झाल्याने धक्का बसलेल्या आईने देखील प्राण सोडल्याची दुखद घटना घडली आहे. कोपार्डे ता. शाहूवाडी येथील सौ. नंदाताई कृष्णा पाटील (वय ६०) असे या महिलेचे नाव आहे. शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे येथे अतीउच्च वीजेच्या तारेचा स्पर्श होऊन सुहास कृष्णा पाटील व स्वप्नील कृष्णा पाटील या सख्ख्या भावांचा बुधवार (दि ३) रोजी दुर्देवी मृत्यू झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी, कोपार्डे ता.शाहूवाडी येथील कडवी नदीजवळ असणाऱ्या शेतात सुहास कृष्णा पाटील (वय ३६) व स्वप्नील कृष्णा पाटील (वय ३१) हे दोघे भाऊ शेतात पिकांवर तणनाशक मारण्यासाठी गेले होते. तणनाशक मारत असताना सुहासला वीजेच्या तारेचा जोरदार धक्का बसून तो शेतात पडला असता, दादा काय झाल असे म्हणत स्वप्नील त्यांच्याजवळ गेला असता त्यालाही वीजेचा धक्का बसला. यात दोघाही भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आपली दोन्ही मुले अजून घरी का आली नाहीत म्हणून त्यांचे वडिल कृष्णा पाटील तेथे गेले होते. दोन्ही मुले गतप्राण झाल्याचे पाहून त्यांनी आरडा ओरड केली असता गावातील लोकांनी धाव घेऊन त्यांना आधार दिला. दोन्ही कमवती मुले काळाने हिरावून घेतल्याने आई-वडिल, सुहासची पत्नी असे घरातील सर्वजण हताश होते.
आपल्या दोन्ही मुलांचा आकस्मित मृत्यू झाल्याचे दुखः त्यांच्या आई नंदा पाटील यांना सहन झाले नाही. आज रविवार (दि. ७) रोजी दोन्ही मुलांचे रक्षाविसर्जन होते. तत्पूर्वी शनिवारी रात्री अकरा वाजता आई नंदा यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना दवाखान्यात दाखल केले, मात्र त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली. दोन मुले, पत्नी यांचा आकस्मित मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबिय उध्वस्त झाले आहे. जिवंतपणी दोन्ही कर्त्या मुलांना व पत्नीला अग्नी देण्याची वेळ कृष्णा पाटील यांच्यावर आली.
सुहास आणि स्वप्निल यांच्या निधनानंतर आई नंदाताई कृष्णा पाटील यांच्यावर काळाने घाला घातला. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर आज रविवारी (दि. ७) रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटूंबाचा व नातेवाईकांचा काळीज पिळवटून काढणारा आक्रोश उपस्थितांनाही हेलावून गेला.