आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश; हाळवणकरांच्या भूमिकेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का! MLA Prakash Awade Joins BJP
कोल्हापूर | इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी मुलगा राहुल आवाडे यांच्यासह भाजपमध्ये (MLA Prakash Awade Joins BJP) प्रवेश केला आहे. आज 25 सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये आवाडे पिता पुत्रानी भाजप प्रवेशाचा योग साधला आहे.
आवाडेंच्या भाजपमधील प्रवेशाने माजी आमदार, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर कोणती भूमिका घेणार अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. मात्र खुद्द हाळवणकरच आवाडे पिता पुत्रांना स्टेजवर घेऊन आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे दोघांमधील राजकीय वाद मिटवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
आमदार प्रकाश आवाडे यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या ठिकाणी त्यांनी राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्याच बरोबर त्यांनी हातकणंगलेमधून जयश्री कुरणे यांना उमेदवारी जाहीर केली होती. विशेष म्हणजे उमेदवारी मागण्यासाठी कोणाकडे जाणार नसल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या ताराराणी पक्षाकडून या दोन्ही जागांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे दोन इचलकरंजी आणि हातकणंगले मतदारसंघांत महायुतीची डोकेदुखी वाढली होती. मात्र, आता प्रकाश आवाडे यांनीच थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने राहुल आवाडे यांची भाजपकडून इचलकरंजी विधानसभेसाठीची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यापूर्वी मुंबईमध्ये प्रकाश आवाडे यांनी भेटीघाटी घेत चर्चा केली होती. या भेटीगाठीमध्ये त्यांनी मुलासाठी उमेदवारीचा शब्द घेतल्याची चर्चा सुरू होती. गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या मुलाची आणि जयश्री कुरणे यांची उमेदवारी केवळ भाजप आणि महायुतीवर दबाव वाढवण्यासाठीच जाहीर केल्याची चर्चा होती. तेव्हापासूनच प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याचे बोलले जात होते.
दरम्यान प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे कट्टर राजकीय विरोधक व माजी आमदार, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर कोणती भूमिका घेणार याकडे सुद्धा लक्ष होते. मात्र, हाळवणकरांनी वरिष्ठांच्यासमोर तलवार म्यान करत आवाडे पिता-पुत्रांनाच सोबत घेत व्यासपीठावर दाखल होणे पसंत केले आहे. त्यामुळे आवाडे-हाळवणकरांमधील राजकीय वाद संपवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी पुढाकार घेतल्याची चर्चा आता रंगली आहे.