मुंबई | मुंबईत आपलं छोटंसं का होईना घरं असावं असं प्रत्येकाला वाटत असलं तरी प्रत्येकाला ते आर्थिकदृष्ट्या परवडतं असं नाही. यामुळेच शासनाने सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात घरं उपलब्ध करून देण्यास सुरवात केली आहे. यासाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4 हजार 83 घरांच्या विक्रीसाठी ही अर्ज प्रक्रिया राबवली जात आहे.
आज सोमवार (22 मे ) दुपारी 3 वाजेपासून ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 26 जून असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर म्हाडाच्या घरांची ऑनलाईन सोडत 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता, वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार आहे. सदनिकांच्या विक्रीकरिता किंवा तत्सम कोणत्याही कामासाठी कोणालाही दलाल म्हणून नेमलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नयेत असं आवाहन म्हाडाकडून करण्यात आलं आहे.
कसा करायचा ऑनलाईन अर्ज
- यासाठी तुम्हाला आधी म्हाडाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे.
- तुमची माहिती, उत्पन्नाचा दाखल आणि इतर कागदपत्र तुम्हाला स्कॅन करून जोडायची आहेत.
- अनामत रकमेचा भरणा बँकेत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे करण्यासाठी 28 जून रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे.
- प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 4 जुलै रोजी दुपारी 3 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in आणिhttps://www.mhada.gov.in वेबसाईटवर पहायला मिळणार आहे.
- प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाइन दावे आणि हरकती 7 जुलै रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येतील.
- सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी 12 जुलै रोजी दुपारी 3 वाजता वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.