मुंबई: मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay Highcourt) मोठा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी सुरू असलेली सुनावणी आता नव्याने सुरू होणार असून, त्यासाठी विशेष पूर्णपीठ स्थापन करण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे.
मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुन्हा सुरुवातीपासून सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांनी मुख्य न्यायमूर्तींकडे नवीन पीठ स्थापनेची विनंती केली होती, जी मान्य करण्यात आली आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना या संदर्भात रजिस्ट्रारकडे नव्याने अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत.
Maratha Reservation निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता
या निर्णयामुळे मराठा आरक्षण प्रकरणाचा निकाल काही महिन्यांसाठी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण यापूर्वीची सुनावणी जवळपास 60% पूर्ण झाली होती. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपलेला असून सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची बदली झाल्याने आता नव्या पीठासमोर दोन्ही बाजूंना पुन्हा युक्तिवाद करावा लागणार आहे.
पुढील वाटचाल
नव्या विशेष पूर्णपीठाच्या स्थापनेनंतर मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी नव्याने सुरू होईल. त्यामुळे हा मुद्दा तातडीने निकाली लागण्याऐवजी आणखी काही काळ प्रलंबित राहण्याची शक्यता आहे.