मोठी बातमी! “… तर मनोज जरांगे पाटील राज्य बंद पाडणार”; जाणून घ्या नेमकं प्रकरण | Manoj Jarange -Walmik Karad
Walmik Karad | संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तब्बल तीन आठवड्यानंतर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला सीआयडीने ताब्यात घेतले आहे. (Walmik Karad arrested) वाल्मिक कराड आज पुणे सीआयडीला सिनेमा स्टाईल पध्दतीने शरण आल्याचे चित्र सर्वांना पहायला मिळाले. यावर आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “कोण शरण आलं आणि कोण नाही याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नाही. आमच्या भावाची हत्या झाली. त्यातील आरोपी सुटता कामा नये. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे.
अंजली दमानिया, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके आणि यासोबत राज्यातील मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. सर्व पक्षातील, सर्व जाती धर्मातील लोक रस्त्यावर आहेत. मुख्यमंत्री साहेब यातला एकही माणूस सुटता कामा नये. आमचं कोणाचं तुम्ही ऐकू नका. कुटुंबाला जे वकील हवेत ते वकील द्या,” अशी मोठी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
“या प्रकरणाचा छडा लावा. हे जेलमध्ये सडले पाहिजे. जर यातला एकही माणूस सुटला, तर त्या दिवशी राज्य बंद पडलंच म्हणून समजा. राज्यातील मराठा एका तासात संपूर्ण राज्यात उभा राहणार. त्यावेळी आम्ही न्याय करु. फडणवीस साहेब न्याय देतील, या आशेने देशमुख कुटुंब तुमच्याकडे डोळे लावून बसलं आहे. फडणवीस साहेब सर्वांना कायमस्वरुपी जेलमध्ये टाकतील, याची आम्हाला खात्री आहे,” असेही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.