मनोज जरांगेंची शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यात, ‘असा’ असेल रॅलीचा मार्ग | Manoj Jarange
कोल्हापूर | मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला उद्या 7 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी हिंगोली जिल्ह्यातून त्यांनी शांतता रॅलीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात केली होती. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांचा दौरा करत छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्या टप्प्यातील रॅलीची सांगता केली होती.
मनोज जरांगे (Manoj Jarange) आता, पुन्हा एकदा शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात दौरा करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यातून त्यांची शांतता रॅली जाणार आहे. या रॅलीची सुरवात सोलापुर जिल्ह्यातून (Solapur) होणार असून नाशिकमध्ये सांगता होणार आहे.
मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीसाठी सोलापूरकर सज्ज झाले असून जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातून मराठा बांधव उद्या सोलापुरात एकत्र येणार आहेत. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे यांच्या उपस्थितीत मोठी सभा होणार आहे. शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत असून 13 ऑगस्ट रोजी नाशिक येथे शांतता रॅलीचा समारोप होणार आहे.
7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट असा 7 दिवसांचा मनोज जरांगे पाटील यांचा दौरा असणार आहे. मनोज जरांगे यांच्या मराठवाड्यातील शांतता रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता, पश्चिम महाराष्ट्रातही शांतता रॅलीसाठी सकल मराठा समाज पुढाकार घेऊन कामाला लागल्याचं दिसून येत आहे. नुकतेच, मनोज जरांगे सोलापूरसाठी अंतरवाली सराटीमधून रवाना झाले असून आज त्यांचा तुळजापूर येथे मुक्काम असणार आहे.
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची शांतता रॅली निघत आहे, दुसरीकडे मनसे नेते राज ठाकरे हेही महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तर, आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दौरा करत आहेत. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळीच राजकीय मंडळी कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात, यंदाच्या निवडणुकीत आरक्षण हा महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे.
असा असणार शांतता रॅलीचा मार्ग
- 7 ऑगस्ट – सोलापूर
- 8 ऑगस्ट – सांगली
- 9 ऑगस्ट – कोल्हापूर
- 10 ऑगस्ट – सातारा
- 11 ऑगस्ट – पुणे
- 12 ऑगस्ट – अहिल्यादेवी नगर (अहमदनगर)
- 13 ऑगस्ट – नाशिक