“धनंजय मुंडे तुमची टोळी थांबवा”, अन्यथा….; Manoj Jarange Patil यांचा इशारा
धाराशिव | सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार टीका करत सरकारला इशारा दिला.
जरांगे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “जर मराठा समाजाला पुन्हा त्रास झाला, तर त्याचा सामना थेट माझ्याशी असेल. मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांची टोळी थांबवावी. ही धमकी नाही, तर सावधानतेचा इशारा आहे. तुमच्या गुंडांनी मराठा समाजातील कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, तर आम्ही त्यांचा बंदोबस्त करू. तुमच्या पापांवर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न करू नका.” असा सज्जड दमच मुंडे यांना दिला.
मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडत नाही
दरम्यान, “मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडत नाही. तसेच मी 25 तारखेपर्यंत काहीच बोलणार नाही. मात्र त्यावेळी उपोषण केल्यावर मराठा समाजास आरक्षण मिळाल्यावर मग मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाहतो, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत”.
आरोपींवरील मोक्का अमान्य
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आठ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. या आरोपींमध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतिक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी या प्रकरणातील मोक्का अमान्य असल्याचे सांगितले.
“सर्व आरोपींना समान न्याय द्यावा. जर खंडणीतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावला गेला नाही, तर आम्हाला हा मोक्का देखील मान्य नाही. खंडणीतील आरोपींवर देखील मोक्का लागला पाहिजे. कारण हा सर्व प्रकार खंडणीमुळेच घडला आहे. त्यामुळे खंडणीतील आरोपी हे देखील खुनाच्या गुन्ह्यात आले पाहिजेत, असं जरांगे यांनी यावेळी ठामपणे सांगितले.