News

महाविकास आघाडी कोल्हापुरसह राज्यात सर्वाधिक जागा जिंकेल – आमदार सतेज पाटील

कोल्हापूर | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) आणि महायुती (Mahayuti) अशा राजकीय संघर्षाबरोबर तिसरी आघाडी देखील तयार होत असल्याने निवडणुकीला चांगलीच धार येणार आहे. असं असलं तरी सर्वच पक्षांचे नेते आम्हीच सर्वाधिक जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादी (NCP) या घटक पक्षांनी काही जागा मागितल्या आहेत. मात्र जिथे ज्याची ताकद, तिथे त्याला जागा सोडली जाईल, असे स्पष्ट करत या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक बळ कोल्हापूर जिल्हातूनच मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी व्यक्त केला. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

आमदार पाटील यांनी राज्यात महाविकास आघाडीचे १५० जागांवर एकमत झाल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावे ही लोकांची इच्छा आहे. त्यामुळे राज्यातील आताची परिस्थिती बदलण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. महाविकास आघाडीचे १५० जागांवर एकमत झाले असून उर्वरित जागांचा निर्णयही लवकरच येत्या बैठकीत होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या काही जागा अंतिम झाल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीने काही जागा मागितल्या आहेत. काँग्रेसनेही काही जागांवर दावा केला आहे. ज्याची जिथे ताकद असेल त्याला ती जागा सोडली जाईल. विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात महाविकास आघाडी सर्वाधिक भक्कम दिसेल.

आ. सतेज पाटील, विधानपरिषद गटनेते


मुख्यमंत्रिपदापेक्षा शाश्वत सरकारला प्राधान्य

मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही. सर्वच पक्षांना मुख्यमंत्रीपद मिळावे असे वाटते, त्यात काही गैर नाही. मात्र, या पदापेक्षा शाश्वत सरकार देणे यालाच आमचे प्राधान्य राहील. महाविकास आघाडी हा मोठा भाऊ म्हणून निवडणुकीत उतरेल, असे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा विश्वास

राज्यातील लोकांचा कल ध्यानात घेता, लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकीतही अशीच परिस्थिती राहील. त्यामुळे ५८ पैकी ४५ हून अधिक जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

Back to top button