Weather

Maharashtra Weather Update: रायगड जिल्ह्यात शाळांना सुट्टी, कोल्हापूर जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’, पुण्यात धो-धो.. 3 तासात 219 मिमी

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून गेल्या काही दिवसांपासून पाऊस जोरदार कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि घाटमाथ्यावर अव्याहतपणे कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुणे, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, खेड या जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत.

पुण्यात गुरुवारी पहाटेपासून धुवांधार पाऊस – Maharashtra Weather Update

पुणे जिल्ह्यातील मावळ, भोर, मुळशीसह शहरात गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मावळ तालुक्यातील कुरवंडे गावात अवघ्या तीन तासांत २१९ मिमी पावसाची नोंद झाली. पहाटे सहा ते नऊ या दरम्यान अक्षरशः पावसाने कहर केला असून शहरातील सर्व रस्ते तुंबले आहेत, वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांची व त्यांच्या पालकांचे हाल झाले आहेत. कामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांना देखील याचा मोठा तडाखा बसला आहे.

रायगडमध्ये नद्या धोक्याच्या पातळीवर; पाच तालुक्यांतील शाळा बंद – हवामान अंदाज 2025

रायगडमध्ये सततच्या पावसामुळे कुंडलिका, पाताळगंगा आणि आंबा नद्या धोक्याच्या रेषेवर वाहत आहेत. हवामान खात्याने आज (१९ जून) ‘ऑरेंज अलर्ट’ दिल्यानंतर, अलिबाग, रोहा, तळा, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांतील सर्व शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

रोहा तालुक्यात कुंडलिका नदीने तर खालापूरमध्ये पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागोठणेतील आंबा नदीही सतर्कतेच्या पातळीवर आली असून, पाली-खोपोली रस्ता आणि खुरावले फाट्यावरील अंतर्गत मार्ग बंद करण्यात आले आहेत. वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे.

खेडमध्ये जगबुडी नदीचं पाणी बाजारात – Weather Update 2025

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्यामुळे जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. मटण मार्केट परिसरात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची धांदल उडाली. नगर परिषदेकडून तातडीने सूचना दिल्या गेल्या असून, परिसरात पूर आल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून उपाययोजना सुरू आहेत.

कोल्हापुरात १७ बंधारे पाण्याखाली; पंचगंगा २५ फूटांवर – Monsoon 2025

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरणांमधील साठा झपाट्याने वाढत आहे. १७ बंधारे पाण्याखाली गेले असून, राधानगरी धरणातून सुरू असलेला विसर्ग वाढवल्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी २५ फुटांवर पोहोचली आहे.

दरम्यान, अलमट्टी धरणातून ७० हजार क्युसेकने विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी अलमट्टी धरणाची पातळी ५१५ मीटरपर्यंत स्थिर ठेवावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

शाहुवाडीत कानसा नदीला पूर; कांडवण प्रकल्प भरून वाहतोय

कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहुवाडी तालुक्यातील कांडवण लघुपाटबंधारे प्रकल्प १००% भरला असून, त्याचा विसर्ग सुरू आहे. कानसा नदीपात्रात सेकंदाला २२५ घनफूट पाणी सोडलं जात आहे. विरळे, जांबूर, पळसवडे, मालेवाडी यांसारख्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील इतर भागातही सतर्कतेचा इशारा – IMD Weather Alert

  • पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक या घाटमाथ्यावरील जिल्ह्यांत आजही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
  • नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव याठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता.
  • मराठवाड्यात (लातूर, बीड, हिंगोली, नांदेड, अहमदनगर, परभणी) वीजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
  • विदर्भात (अकोला, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली) वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Rajendra Hankare

राजेंद्र हंकारे हे मागील 15 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी IBN लोकमत, Saam TV या प्रमुख माध्यमांमध्ये पत्रकारिता केली आहे. साम टिव्हीच्या माध्यमातून त्यांनी कृषिपत्रकारितेत उल्लेखनीय काम केले असून 2019 पासून ते Lokshahi News मध्ये कंटेंट रायटर म्हणून काम करत आहेत. ते राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि कृषी विषयांवर सखोल आणि विश्वसनीय लेखन करतात.
Back to top button