News

महाराष्ट्रात आज दुपारपासूनच आचारसंहिता; निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद थोड्याच वेळात, तारखा जाहीर होणार | Maharashtra Vidhan Sabha Election 2024

मुंबई | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा (Vidhan Sabha Election 2024) बिगुल वाजला आहे. आज (15 ऑक्टोबर) दुपारी 3.30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा करणार आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद पार पडणार आहे. दुपारी 3.30 मिनिटांनी ही पत्रकार परिषद सुरू होईल. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रसह झारखंड विधानसभा निवडणुकीचा देखील कार्यक्रम जाहीर केला जाईल. दिवाळीच्या सुट्ट्यांच्या तारखा वगळून सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम आखण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

\"\"

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यातच आता  केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद पार पडत असल्याने सर्वांचेच लक्ष त्याकडे लागले आहे. महाराष्ट्रातील निवडणूक यंत्रणेची तयारीही अंतिम टप्प्यात सुरु आहे. 

विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होईल. महायुतीमध्ये भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना; अशी थेट लढत होणार आहे.

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये आयोगाच्या सदस्यांनी विविध राजकीय पक्ष, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधून सूचना मागवल्या होत्या. त्याचवेळी निवडणुका जाहीर होतील, असं वाटत असताना आयोगाने केवळ तांत्रिक माहिती देत सणांच्या तारखा टाळून निवडणुका होतील, असे स्पष्ट केले होते.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत कधीपर्यंत?

महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका पार पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Back to top button