शिवसेनेच्या ‘ब्रेकअप’ची पुढील सुनावणी थेट ‘व्हॅलेंटाईन डे’ ला, तर संजय राऊत म्हणतात ‘सगळं प्रेमाने होईल’ | आज कोर्टात काय झाल? वाचा

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत काहीतरी ठोस निकाल लागेल अशी अपेक्षा दोन्ही गटांना वाटत होती. परंतु न्यायालयाने पुढील तारीख देत तारीख पे तारीखचा फंडा कायम ठेवला. आता शिवसेनेच्या ‘ब्रेकअप’संदर्भातील पुढील सुनावणी ‘व्हॅलेंटाईन डे’ ला म्हणजेच 14 फेब्रवारीला होणार आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती एम आर शाह, सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचुड. न्यायमूर्ती क्रिष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती पी. एस नरसिंम्हा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद  केला. तर बाळासाहेबांची ठाकरे पक्षाकडून हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. पुढील सुनावणी ही 14 तारखेला होणार आहे.

कोर्टाच्या निर्णयावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

‘ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब आहे. आज मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं, 14 तारीख चांगली आहे. 14 तारखेला व्हेंलटाईन डे आला आहे. समजून जा, त्या दिवशी सगळं प्रेमाने होऊन जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. 14 फेब्रुवारीपासून 7 जणांच्या खंडपीठापुढे किंवा आहे त्याच खंडपीठाकडे सुनावणी होणार आहे.

काय आहे वाद?

आपण शिवसेना सोडलेली नसून आपला गटच खरी शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आपल्याच गटाला मिळावे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने एका याचिकेद्वारे निवडणूक आयोगाकडे केला आहे. मात्र, शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत कोणतीही कार्यवाही करण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने करण्यात आली होती.