Saturday, September 23, 2023
HomeCareerखुशखबर! शिक्षक भरतीला सरकारचा हिरवा कंदील | Maharashtra Shikshak Bharti 2023

खुशखबर! शिक्षक भरतीला सरकारचा हिरवा कंदील | Maharashtra Shikshak Bharti 2023

मुंबई | मराठी आणि उर्दू सरकारी शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती (Maharashtra Shikshak Bharti 2023) करण्यास राज्य सरकारने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. सध्या रिक्त असलेल्या ६० हजार जागांपैकी ३० हजार जागा भरण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र या जागा भरताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने निश्‍चित करून दिलेल्या नियमावलीच्या आधारे रिक्त जागा भरण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करावी, असा आदेश सर्व जिल्हा परिषदांना दिला आहे. तब्बल बारा वर्षांपासून ही भरती रखडलेली होती.

सध्या राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आदी संस्थांमधील मिळून एकूण ६० हजार जागा रिक्त आहेत. यापैकी १८ हजार जागा फक्त जिल्हा परिषदांमधील आहेत. राज्य सरकारने दिलेल्या परवानगीनुसार ६० हजारांपैकी निम्म्या जागा भरल्या जाणार आहेत. २१ जून २०२३ रोजी सरकारने याबाबतची भरती प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. 

राज्यातील शिक्षक भरतीवर २०११ पासून बंदी होती. ही बंदी २०१९ मध्ये उठविण्यात आली. परंतु बंदी उठून पाच वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप शिक्षकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू होत नसल्याचे दिसून आले होते. दरम्यान, राज्यातील तत्कालीन महायुती सरकारने २०१९ मध्ये ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून शिक्षक भरती ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता.

यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये शिक्षक भरतीची अभियोग्यता चाचणीही घेण्यात आली होती. त्या वेळी सुमारे पावणे दोन लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी केवळ चार ते पाच हजार उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या एकूण रिक्त जागांमध्ये मराठी शाळांतील १६ हजार ७४८ आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमधील १ हजार ३०१ जागांचा समावेश आहे. प्रत्यक्षात कन्नड, बंगाली, तेलगू, गुजराती अशा भाषांच्या शिक्षकांचीही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular