Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र पोलीस दलात सध्या २,२१,२५९ मंजूर पदांपैकी ३३,००० हून अधिक पदे रिक्त आहेत, ज्यात महिला पोलिसांचा समावेश केवळ १६.६% आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १ लाख लोकसंख्येमागे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या विविध संस्थांद्वारे वेगवेगळी सुचवली जाते.
संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेनुसार, १ लाख लोकसंख्येमागे २२५ पोलीस कर्मचारी असावेत, तर युरोपियन युनियनच्या शिफारसीनुसार, हे प्रमाण १ लाख लोकसंख्येमागे ३१८ पोलीस कर्मचारी आहे. तथापि, हे प्रमाण देशांच्या सामाजिक, आर्थिक आणि स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकते.
Maharashtra Police Bharti 2025
भारतात हे प्रमाण सरासरी १५२ आहे, जे ७३ ने कमी आहे. देशभरात सर्वाधिक रिक्त पदे बिहारमध्ये असून, तेथे सुमारे ४१% पदे रिक्त आहेत. तेलंगणात २८% आणि महाराष्ट्रात सुमारे १६.३% पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र सरकारने ही रिक्त पदे भरण्यासाठी पुढील पोलीस भरती प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ अंतर्गत लवकरच नवीन जाहिरात प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पातील १०० रुपयांमधून गृह विभागाला फक्त ५.४० रुपये मिळतात, ज्यापैकी पोलिसांच्या वाट्याला केवळ ४.११ रुपये येतात. २०१५-१६ ते २०२१-२२ या ७ वर्षांच्या कालावधीत गृह विभागाने पोलीस खात्यावर सरासरी १३,४७२ कोटी रुपये खर्च केले आहेत.
राज्यातील पोलिसांची संख्या वाढवून कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नागपूर शहर पोलीस दलात काही पदे रिक्त असली तरी, विद्यमान पोलिसांची संख्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेशी आहे. रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.