मुंबई | देशाच्या उत्तर भागात थंडीची मोठी लाट आल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान या थंडीचा परिणाम आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवरही होताना दिसत आहे. राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तरेकडील काही जिल्ह्यांसह आता कोकणातही थंडीचा (Maharashtra Konkan Cold Wave Alert) कहर जाणवण्याची शक्यता आहे.
उत्तरेतून वाहणाऱ्या वाऱ्याचा परिणाम राज्यातील बहुतेक जिल्ह्यांवर होणार असल्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारी भागात, उत्तर महाराष्ट्रात काही भागांत 18 जानेवारीपर्यंत थंडीचा मुक्काम असेल त्यामुळे कोकणातील गारठा आणखी दोन दिवस असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 48 तास थंडीचा कोकणात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तरेकडून थंड वारे येत असल्याने महाराष्ट्रातील किनारी भागात तापमान कमी होत आहे. त्यामुळे बाष्पाचा पुरवठा आणि ढगाळ स्थिती निर्माण होऊन तापमानात चढ-उतार होत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आणि पाठोपाठ पावसाळी वातावरण, तसेच दाट धुक्याचे वातावरणही तयार होत आहे. त्याचा परिणाम किनारी भागावर होण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात कडाक्याच्या थंडीत हवामान विभागाने दिला होता पावसाचा इशारा
नव्या वर्षाची सुरुवात झाल्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये थंडीचं प्रमाण वाढल्यामुळं हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला होता. दरम्यान, काही ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हिमवृष्टीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर डोंगराळ राज्यांमध्ये पावसाचा इशाराही देण्यात आला होता. हिमाचल उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता तर बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशसह अनेक भागात 15 जानेवारीदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.
पूर्वेकडील राज्यात बर्फवृष्टी आणि पावसाचा इशारा देण्यात आला होता. पुणे आणि नाशिकमध्येही किमान तापमानात लक्षणीय घट पाहायला मिळेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. जानेवारी महिन्यात तापमानात मोठी घसरण झाली आहे. जम्मू आणि काश्मीर आणि लडाख, विशेषत: उत्तर-पश्चिम जम्मूमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा हिमवर्षाव होऊ शकतो असेही सांगण्यात आले होते. उत्तर प्रदेशच्या काही भागात दाट ते दाट धुके पडण्याची शक्यता आहे. जम्मू आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ येऊ शकते.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील आठवड्यात देशातील वातावरणात सातत्यानं बदल पहायला मिळाले. काही ठिकाणी थंडीचा जोर वाढला, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. दिल्लीत जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.