News

Maharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहुर्त सापडला, शिंदे-फडणवीसांची मोठी खलबतं, कोणाला मिळणार किती मंत्रिपदे?

मुंबई | विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 20 दिवस उलटल्यानंतर आता बऱ्याचशा घडामोडींनंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहुर्त मिळाला आहे.

महायुतीच्या नेत्यांची दिल्लीवारी, त्यानंतर बैठकांचे सत्र झाल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये होणार आहे. रविवारी, 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर महत्त्वाच्या खात्यांची मागणी आणि मंत्र्यांच्या नावांची संभाव्य यादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाट्याला आलेल्या मंत्रीपदांमध्ये जुन्या चेहऱ्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात महायुतीला स्पष्ट आणि प्रचंड बहुमत मिळाले. त्यानंतर निकालाच्या जवळपास 13 दिवसांनी 5 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता.

असा असेल मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला

मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला अखेर ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. या फॉर्म्युल्यानुसार, भाजपकडे 22 मंत्रिपदे असणार आहेत. तर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 12, अजितदादांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर यामध्ये गृहखाते हे भाजपकडेच असणार आहे.

भाजपला 18 कॅबिनेट तर 4 ते 5 राज्यमंत्रीपद मिळणार आहे. तर, शिवसेनेला 9 कॅबिनेट तर 2 ते 3 राज्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादीला 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Back to top button