मुंबई | आज नवी मुंबईत झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला गालबोट लागलं आहे. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज (16 एप्रिल) महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान उष्माघाताचा त्रास होऊन २० श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर ३०० जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
नवी मुंबईतील खारघर इथे आयोजित या कार्यक्रमाला लाखो माणसं उपस्थित होती. नवी मुंबई परिसरात आज पारा चाळिशीपल्याड गेला होता. याचा त्रास सोहळ्याला उपस्थित राहिलेल्यांना झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रीमंडळातील अन्य सदस्यही उपस्थित होते.
उष्माघाताचा त्रास झालेल्या रुग्णांना भेटण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले. मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना शासनाकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांचा सर्व उपचार खर्च शासनातर्फे केला जाणार आहे.
उष्माघातामुळे अनेक जणांना चक्कर आली, तर अनेक जणांना उलट्याही झाल्या. अस्वस्थ झालेल्यांना खारगघरमधील टाटा रुग्णालय, पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालय तसंच मेडी कव्हर रुग्णालय आणि एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.