रायगड | जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शालगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका आदिवासी पाड्यावर मोठी दरड कोसळली असून रात्री झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातला आहे.
या दुर्घटनेत 120 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच एकूण 75 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. येथे माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे. रायगडमधील तळीये आणि माळीण गावावर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता.
यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.
मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल
या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेत आहेत.
इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून 6 किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी आहे. येथे आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. या घरांवर दरड कोसळली असून प्राथमिक माहितीनुसार, या वाडीतील 90 टक्के घरे ढिगाऱ्याखाली गेली आहेत. यामुळे मोठी जीवितहानी झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार एकूण येथे 48 कुटुंब आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.