Govt. Scheme

\’लाडकी बहीण योजनेच्या अटी & कागदपत्रांमध्ये मोठा फेरबदल; रांगेत उभं राहण्याआधी वाचा ही बातमी! | Ladki Bahin Yojana

मुंबई | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या अटींमध्ये आता मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने वयोमर्यादेत वाढ करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्याचबरोबर या योजनेसाठी डोमिसाईल सर्टिफिकेट ऐवजी जन्मदाखला तसंच मतदार ओळखपत्रही चालणार आहे.

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतून 5 एकर जमिनीची अट देखील हटवली आहे, तसंच अडीच लाखांच्या उत्पन्नाची मर्यादा कायम राहणार आहे पण जमिनीची अट असणार नाही. अडीच लाख उत्पन्नाचा दाखला नसेल तर केशरी आणि पिवळ्या रेशनकार्डच्या आधारे योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच मुलगी महाराष्ट्रातील नसेल तर पतीच्या महाराष्ट्रातील पुराव्याच्या आधारेही महिलांना हा लाभ घेता येणार आहे. यामध्ये परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

याबरोबरच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची तारीख देखील सरकारकडून वाढवण्यात आली आहे. आधी 15 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती, पण तहसीलदार कार्यालय आणि सरकारी कार्यालयात मोठी गर्दी होत असल्याचे ध्यानात आल्यानंतर आता 31 ऑगस्टपर्यंत योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आलेत. या योजनेची घोषणा झाल्यापासून राज्यभरातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला महिलांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा \’असा\’ घ्या लाभ; दरमहा थेट खात्यावर मिळतील 1500 रूपये | Ladki Bahin Yojana

मुंबई | राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी, तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण योजना घोषित केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची घोषणा केली असून \’मुख्यमंत्री लाडकी बहीण\’ (Ladki Bahin Yojana) या नावाने ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेनुसार राज्यातील 21 ते 65 वयोगटामधील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. 

महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन, आरोग्य आणि पोषणासह सर्वांगिण विकासासाठी या योजनेंतर्गत 21 ते 65वयोगटामधील पात्र महिलांना सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये प्रदान केले जातील. ही योजना जुलै 2024 पासून लागू केली जाईल. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ विवाहित, विधवा तसेच घटस्फोटित महिलांना मिळणार आहे. या योजने अंर्तगत  लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति माह दिले जाणार आहेत.

योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता

१) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
२) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
३) किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४) सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
५) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक

१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
२) लाभार्थ्याचे आधार कार्ड.
३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला/मतदान ओळखपत्र
४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, आणि नसेल तर केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).
५) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
६) पासपोर्ट आकाराचा फोटो.
७) रेशनकार्ड.
८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

अलिकडेच राज्य सरकारनं शासकीय अधिकाऱ्यांचं एक पथक मध्य प्रदेशला पाठवलं होतं. या पथकाद्वारे मध्य प्रदेशमधील \’मुख्यमंत्री लाडली बहना\’ योजनेचा अभ्यास करण्यात आला. ही योजना कशी राबवली जाते? त्यासाठी नेमके प्रारूप काय आहे? यासाठी काय-काय तरतूदी काय असतील? याचा या पथकानं अभ्यास केला होता. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करताना अजित पवार म्हणाले की, स्त्री ही कुटुंबाचा आधार असते. आता ती एकूणच समाजाचा केंद्रबिंदू होते आहे. कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थाजन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढत आहे. एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या आणि कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळत आहेत. विविध परीक्षांमधून मुलींची आघाडी दिसून येत आहे. अशा आपल्या कर्तृत्ववान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, आमच्या लेकी बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाणार आहे.

Back to top button