लाडकी बहिण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया कधी सूरू होणार? राज्यातील लाखो महिला योजनेपासून अद्यापही वंचित | Ladki Bahin Yojana
मुंबई | राज्यातील महायुतीचे सरकार लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) आशिर्वादाने सत्तेत आल्याचे महायुतीचे नेते सांगत आहेत. मात्र आता लाडक्या बहिणींचा वापर केवळ मतदानापुरताच करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांची अनेक अटी आणि निकष लावून छाननी करण्यात येत असून लाभार्थी महिलांना यादीतून वगळण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
नव्याने अर्ज प्रक्रिया कधी सूरू होणार? राज्यातील लाखो महिला प्रतिक्षेत
दुसरीकडे ज्याचे फॉर्म अद्याप भरलेच गेलेले नाहीत अशा राज्यातील लाखो महिला नव्याने अर्ज प्रक्रिया कधी सूरू होणार याची आतुरतेने वाट पाहत आहे. अनेकींचे आधार कार्ड अपडेट नसणे, विवाहानंतरचे नाव कागदोपत्री अपडेट नसणे, त्याच नावाने बँकेत खाते नसणे, केवायसी, अशा अनेक कारणांनी राज्यातील अनेक महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत अर्ज भरता आले नव्हते. यातील अनेकजणींनी मोठी धावपळ करत आवश्यक ती सर्व कागदपत्रे गोळा केली आहेत. मात्र आता अर्ज प्रक्रियाच बंद करण्यात आल्याने त्यांच्या पदरी निराशा पडल्याचे दिसत आहे.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच लाडकी बहिण योजना बंद करण्यात आली होती. तर या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया आचारसंहिता लागण्यापूर्वीच बंद पडल्याचे दिसत होते. अर्ज भरण्यासाठी दिलेली मुदत काही दिवस शिल्लक असताना देखील अर्ज जमा करण्याची प्रक्रिया पूर्णतः ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक महिलांना या योजनेसाठी अर्ज जमा करता आले नव्हते.
ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नव्हते, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP)/आशा सेविका/वार्ड अधिकारी/CMM (सिटी मिशन मॅनेजर)/मनपा बालवाडी सेविका /मदत कक्ष प्रमुख/आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल असे सांगण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडे देखील निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वीच अर्ज स्विकारणे बंद करण्यात आल्याचे दिसत होते.
निवडणुक जिंकण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले होते मोठे आश्वासन
“आम्ही लाडकी बहिण योजना सुरू केली, ज्यामध्ये पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. तुम्ही आमची ताकद वाढवली तर आम्ही मासिक रक्कम 2,000 रुपये करू. तसेच तुम्ही निवडणुकीत मोठा जनादेश दिला, तर आम्ही रक्कम वाढवून 3,000 रुपये करू’, असे शिंदे यांनी म्हटले होते.
निवडणूकीत मोठा जनादेश मिळाल्यानंतर लाडकी बहिण योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवून 1500 ऐवजी 2100 रूपये करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे अगदी कडक अटी व निकष लावून लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यास सुरवात झाली आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.
उद्धव ठाकरेंची महायुती सरकारकडे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची मागणी
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाले आहेत. त्यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “या सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती. मात्र हे सरकार आल्यापासून लाडक्या बहिणींपेक्षा लाडक्या आमदारांची व नावडत्या आमदारांची जास्त चर्चा चालू आहे. परंतु, ते बाजूला ठेवून लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात करायला हवी.
ठाकरे पुढे म्हणाले की, या योजनेचे पहिल्या पाच महिन्यांचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मात्र, पुढचे पैसे वाटायला लागू नये म्हणून या सरकारने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या योजनेवर स्थगिती आणली. मात्र, आता निवडणूक पार पडली आहे. आचारसंहिता संपली आहे. निवडणुकीच्या आधी महिलांची मतं मिळवण्यासाठी जी योजना आणली होती त्या योजनेअंतर्गत महिलांना पैसे दिले गेले नाहीत. ती योजना तात्काळ सुरू केली पाहिजे. तसेच १,५०० नव्हे तर महिलांच्या खात्यात २,१०० रुपये जमा करायला हवेत. कारण असं आश्वासन त्या लोकांनीच निवडणुकीच्या आधी दिलं होतं.
लाडकी बहीण योजनेत तृतीय पंथीयांचाही समावेश करा- आमदार प्रवीण दटके
नागपूरच्या मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी लाडकी बहिण योजने संदर्भात एक वेगळी मागणी केली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून 2100 करावीच. सोबतच या योजनेत तृतीय पंथीयांचाही समावेश करावा, अशी महत्त्वाची मागणी दटके यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणासंदर्भातील चर्चेत केली आहे.