Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 24 तासांच्या आत महायुती सरकारचं डबल गिफ्ट, घेतला मोठा निर्णय
मुंबई | महायुती सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मदतीचा हात देण्यासाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना आता प्रभावी अंमलबजावणीच्या टप्प्यात पोहोचली आहे. वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असलेल्या कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला ₹1,500 त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
जुलै 2023 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून आतापर्यंत पाच हप्त्यांचे एकूण ₹7,500 लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेमुळे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे हप्ते एकत्रित स्वरूपात वितरित करण्यात आले होते.
आजपासून डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे. पुढील चार ते पाच दिवसांत सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बँक खात्याला आधार कार्ड जोडणी नसल्यामुळे ज्यांना यापूर्वी लाभ मिळण्यात अडथळा आला होता, त्या महिलांनाही यावेळी डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता आजपासून वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. आधार लिंक नसलेल्या महिलांच्या अडचणी दूर करण्यात आल्या असून त्यांनाही पुढील काही दिवसांत रक्कम मिळेल.”