लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारचं आणखी एक गिफ्ट; 1500 रुपयांसोबत आता गॅस सिलेंडरही मोफत, जाणून घ्या सविस्तर… | Ladki Bahin Yojana
मुंबई | आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने राज्यात विविध योजना राबवण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही महाराष्ट्रातील महिलांसाठी अशीच एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमता प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या योजनेत आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्यानुसार आता या योजनेच्या लाभार्थी महिलांना वर्षात तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत.
Ladki Bahin Yojana ची प्रमुख वैशिष्ट्ये:
- मोफत गॅस सिलिंडर: या योजनेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे लाभार्थी महिलांना वर्षात तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. यामुळे महिलांना स्वयंपाकाच्या इंधनासाठी होणारा खर्च कमी होईल.
- आर्थिक सहाय्य: या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी ही योजना लागू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनुसार पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. अशातच आता महायुती सरकारने महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट देण्याची तयारी केली असून लाडक्या बहिणींना आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेनंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांबरोबर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांनाही वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. त्यामुळे महिन्याला 1500 रुपयांसह लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मिळणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून पात्र नागरिकांना तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील ५६ लाख हून अधिक कुटुंबाना होणार आहे. अल्प उत्पन्नगट आणि अत्यल्प उत्पन्न गट यांना हा लाभ मिळणार आहे. तीन सिलिंडरचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
केंद्र सरकार उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना एका गॅस सिलिंडरमागे 300 रुपये अनुदान देते. एका गॅस सिलिंडरची सरासरी किंमत 830 रुपये धरून अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्याला प्रति सिलेंडर 530 रुपये याप्रमाणे तीन सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या या योजनेचा सरकारला लाभ मिळणार नाही. त्यामुळे यासंदर्भात राज्याची स्वतंत्र योजना राबवली जावी अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळासमोर मांडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांप्रमाणेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही सरसकट अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे.
राज्य सरकार योजना कशी राबवणार, पैसे कोणाला मिळणार?
लाडक्या बहिणींना तीन सिलेंडर मोफत देण्यासाठी गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तीन सिलेंडरचे पैसे दिले जाणार आहेत. प्रत्येक लाभार्थ्याचा आधार लिंक केला जाणार आहे. त्यामुळे योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना लगाम बसेल. गॅस जोडणी महिलांच्या नावे असेल तरच या योजनेचा लाभ मिळेल. या अटींमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ साधारणत: अडीच कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानस असला तरी मोफत गॅस सिलेंडरचा लाभ प्रत्यक्षात दीड कोटी कुटुंबांनाच मिळेल, असा अंदाज आहे. या योजनेसाठी सरकारी तिजोरीवर अतिरिक्त चार ते साडेचार हजार कोटींचा बोजा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.