मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता खात्यात जमा; एकूण 10,500 रुपये
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) सातवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात शुक्रवारी जमा होण्यास सुरुवात झाली. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. या योजनेद्वारे राज्यातील 21 ते 60 वयोगटातील सुमारे दोन कोटी महिलांना आतापर्यंत दरमहा 1500 रुपये देण्यात आले आहेत. जानेवारीचा हप्ता जमा झाल्यानंतर पात्र महिलांना एकूण 10,500 रुपये मिळतील.
लाडकी बहिण योजनेच्या निकषांची छाननी सुरू – Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मात्र, सध्या योजनेसाठी पात्र अर्जांची छाननी सुरू असून निकषांत न बसणारे अर्ज रद्द होऊ शकतात. काही वृत्तांनुसार, 30 लाख अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते, ज्यामुळे सरकारकडून तब्बल दीड हजार कोटी रुपये वितरित झाल्याची चर्चा होती. परंतु मंत्री अदिती तटकरे यांनी या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्ट केले.
चुकीच्या बातम्यांवर मंत्री तटकरे यांचे स्पष्टीकरण
रायगडमध्ये ध्वजारोहण कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाल्या, “लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील काही बातम्या चुकीच्या आहेत. आमच्या विभागाने अद्याप अपात्र अर्जांची कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे जनतेने या बातम्यांवर विश्वास ठेवू नये.”
वाढीव हप्ता मार्चनंतर
विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप हा वाढीव हप्ता मंजूर झालेला नाही. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मते, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच हा हप्ता वाढवून देण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बजेटमध्ये यावर विचार केला जाईल, असे म्हटले आहे. त्यामुळे मार्च महिन्यात योजनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे.