मुख्यमंत्र्यानी जाहीर केलेली \’लाडका भाऊ योजना\’ फसवी; फसव्या घोषणेमुळे तरूणांमध्ये संभ्रम आणि संताप | Ladka Bhau Yojana
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरातून घोषित केलेली लाडका भाऊ योजना (Ladka Bhau Yojana) फसवी असल्याचे उघड झाल्याने राज्य सरकारविरोधात राज्यातील तरूण वर्गात मोठी संतापाची लाट पसरली आहे. राज्यातील बारावी, पदवी आणि पदविकेचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना भत्ता देण्यासाठी ‘लाडका भाऊ’ योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली खरी पण यामुळे राज्यातील तरुणांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
अर्थसंकल्पात रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमाअंतर्गत युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. तीच योजना पंढरपूरात लाडका भाऊ नावाने घोषित करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फसवणूक केल्याने राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सरसकट विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात येणार असल्याचा संभ्रम यामुळे राज्यातील तरुणांमध्ये निर्माण झाला आहे.
आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पाडला. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना (Ladki Bahin Yojana) ही यापैकीच एक आहे. यामुळे राज्यातील महिला उमेदवार महायुतीकडे वळतील असे प्रयत्न सुरू आहेत.
मुख्यमंत्री युवा कार्य योजना ही देखील अर्थसंकल्पात जाहीर करण्यात दुसरी योजना आहे. मात्र हीच योजना आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक लाडका भाऊ योजना असे सांगून राज्यातील समस्त तरूण बेरोजगार वर्गात संभ्रम निर्माण केला आहे. याबरोबरच मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचे विद्यावेतन देण्यात येणार असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही मदत एक वर्षासाठी देणार असल्याचे सांगून आणखी संभ्रम निर्माण केला आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक आर्हतेनुसार म्हणजे बारावी उतीर्ण असेल तर 6 हजार रूपये, आयटीआय किंवा पदविका असेल तर 8 हजार रूपये आणि पदवीधर, पदव्युत्तर पदवी असेल तर 10 हजार रुपये विद्यावेतन देण्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेचा तातडीने शासन आदेश काढून त्यास मान्यताही देण्यात आली. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राज्य सरकार प्रशिक्षण कालावधीतील उमेदवारांना हे विद्यावेतन देणार आहे. यासाठी पाच हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना आता लाडकी बहिण योजनेच्या प्रसिध्दीमुळे लाडका भाऊ या नव्या लेबलखाली आणून प्रसार करण्यास सूरूवात केलीय. याचे श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री रोज नव्या पद्धतीने ही योजना सांगत सूटले आहेत. अर्थसंकल्पाला मान्यता मिळण्याआधीच लाडकी बहीण योजनेचा शासन आदेश काढण्यात आला, तर आता युवा कार्य प्रशिक्षण योजना रोज नवनवीन नव्या पद्धतीने सांगून संभ्रम निर्माण केला जात आहे.
\’मुळात ही अर्थसंकल्पात केलेली घोषणा आहे. त्यात नवे काही नाही. उद्या लाडका मामा, मामी, सासरा, सासू या योजनादेखील आणतील. केवळ टेंडर काढा आणि मित्राला द्या हेच राज्यात सुरू आहे. अशाने महाराष्ट्र खड्ड्यात जाईल.\’\’
विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा
पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील 12 वी, पदवी आणि पदविका झालेल्या विद्यार्थ्यांना ठराविक रक्कम खात्यात जमा करणार असल्याचे सांगत लाडका भाऊ योजना जाहीर करत असल्याचे सांगितले.
त्यामुळे सरसकट विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात येणार असल्याचा संभ्रम राज्यातील तरुणांमध्ये निर्माण झाला. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचे विद्यावेतन देण्यात येणार असले तरी मुख्यमंत्री शिंदे यांनी ही मदत एक वर्षासाठी देणार असल्याचे सांगत आणखी संभ्रम निर्माण केला आहे.