News

उमेदवारी मागितली नाही, पण.. कृष्णराज महाडिक उत्तरेतून लढणार? | Krishnaraaj Mahadik

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याचे संकेत कृष्णराज धनंजय महाडिक (Krishnaraaj Mahadik) यांनी दिलेत. राज्यातील सत्ताधारी महायुतीचे घटक म्हणून आम्ही सगळेजण एकत्रितपणे कोल्हापूर शहराच्या विकासासाठी काम करत आहोत. सामाजिक कार्याची मला आवड आहे. कोल्हापूर शहराची विकासात्मक वाटचाल व्हावी हा व्यापक विचार डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्यामध्ये राजकारणाचा भाग नाही. मी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली नाही, पण वरिष्ठ पातळीवरून आमदारकी लढवण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे निवडणूक लढवणार, अशी भूमिका कृष्णराज धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे.

 कृष्णराज महाडिक यांनी सरकारकडे पाठपुरावा करून कोल्हापूर शहराच्या रस्ते, गटर्स व इतर विकास कामासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. यापैकी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील 27 प्रभागांना 13 कोटी 90 लाख तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट असलेल्या 23 प्रभागांना 11 कोटी दहा लाख रुपयांचा विकास निधी दिला आहे. येत्या महिनाभरात या प्रभागात रस्ते आणि अन्य कामांना सुरुवात करण्याचे आपले नियोजन आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. तसेच खासदार धनंजय महाडिक यांच्या सहकार्यामुळे हा निधी मंजूर होण्यास मदत झाली. माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम या साऱ्यांचे सहकार्य मिळाले असेही त्यांनी सांगितले.

या निधीतून कोल्हापूर शहरातील विविध भागातील रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण, सामाजिक सभागृह, विरुंगळा केंद्र, बगीचा,  विद्युत दिवे हायमास्ट व्यायामशाळा अशा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विनियोग होणार आहे. याशिवाय कोल्हापूर महापालिकेच्या राजर्षी शाहू जलतरण तलावाच्या दुरुस्तीसाठी आणि सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध झाला आहे. कोल्हापूर शहरातील कचऱ्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असेही महाडिक यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का या प्रश्नावर बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले, मी खेळाडू आहे. सामाजिक कार्याची मला आवड आहे. विविध सामाजिक उपक्रमांत सहभागी असतो. व्हिडिओ ब्लॉगच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा  सामाजिक कामासाठी विनियोग केला आहे. समाजकार्याची आवड आहे. मात्र आपण पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली नाही. महायुतीचे नेते जो उमेदवार देतील त्यांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न करू. वरिष्ठानी मला निवडणुकीची संधी दिली तर मी निवडणूक लढवणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेला भाजप महिला आघाडीच्या रूपाराणी निकम, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, संजीव निकम, विलास वासकर, किरण शिराळे, बाबा पार्टी, निलेश देसाई, उमा इंगळे, स्मिता माने, किरण नकाते, रविकिरण गवळी, सतीश धरपणकर, उदय शेटके, इंद्रजीत जाधव आदी उपस्थित होते.

Back to top button