News

कोल्हापूरचं मटण लोणचं साता समुद्रापार; हौशी खवय्यांची खास निवड, 31 डिसेंबरसाठी मागणीत मोठी वाढ | Kolhapuri Mutton Pickle

कोल्हापूर | तांबडा-पांढरा रस्सा आणि लुसलुशीत मटण यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरात सध्या मटण लोणच्याची चव लोकांच्या जिभेवर रेंगाळतेय. नववर्षाच्या स्वागतासाठी जोरदार पार्ट्यांचं नियोजन करताना कोल्हापुरातील खवय्यांची पसंती मटण आणि चिकन लोणच्याला मिळत आहे. कोल्हापुरातील मोश्मी आणि विक्रांत पोवार या दाम्पत्याकडून बनवले जाणारे मटणाचे लोणचे आता साता समुद्रापार पोहोचले असून स्थानिकांबरोबरच परदेशातही कोल्हापुरी लोणच्याची लोकप्रियता वाढली आहे.

घरगुती चव परदेशातही प्रसिद्ध – Mutton Pickle

कोल्हापूरच्या बिंदू चौकातील मोश्मी आणि विक्रांत पोवार या दाम्पत्याने पाच वर्षांपूर्वी मटण आणि चिकन लोणचं बनवण्यास सुरुवात केली. घरगुती मसाले वापरून तयार केलेल्या लोणच्याची चव स्थानिक खवय्यांना इतकी भावली की ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली. सध्या अमेरिका, दुबई, बेल्जियम आणि लंडनमध्येही कोल्हापुरी लोणच्याला मागणी वाढली आहे.

पोवार दांपत्याची त्यांच्या खवय्या मित्र परिवारासाठी आठवड्यातून किमान चारवेळा मटण चिकनची पार्टी ठरलेली असायची. यातूनच पुढे त्यांनी त्यांच्या हातची चव जिभेवर कायम रेंगाळत राहावी, यासाठी अस्सल मटण आणि चिकनपासून बनवलेलं लोणचं बनवण्यास सुरुवात केली. आता पोवार यांनी बनवलेलं लोणचं साता समुद्रापार पोहोचलं आहे.

कोल्हापुरातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या हौशी मटण खवय्ये मटणाचं लोणचं सोबत घेऊनच जातात. तीन महिने टिकणारं अस्सल कोल्हापूरच्या मातीत तयार झालेलं लोणचं विदेशातही खायला मिळत असल्यामुळं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या कोल्हापूरकरांना पोवार यांच्या मटण लोणच्याची चांगलीच भुरळ पडली आहे.

दिवसाला पाच किलो लोणचं तयार

विक्रांत पोवार यांच्या मते, “आमच्याकडे दिवसाला किमान पाच किलो लोणच्याची ऑर्डर येते. वर्षभरात यामुळे चार ते पाच लाख रुपयांची उलाढाल होते.” पोवार दाम्पत्य अस्सल कोल्हापुरी मसाले आणि पारंपरिक पद्धतीने लोणचं तयार करत असल्यामुळे त्याला चवदारपणा आणि टिकाऊपणा लाभतो. हे लोणचं तीन महिने टिकतं, ज्यामुळे परदेशातही सहज नेलं जातं.

सुट्ट्यांमध्ये मागणी शिगेला

देश-विदेशात स्थायिक झालेल्या कोल्हापूरकरांसाठी मटण आणि चिकन लोणचं हा खाद्यपदार्थ आठवणींचा भाग बनलाय. सुट्ट्यांमध्ये घरी परतल्यानंतर जाताना लोणचं नेणं अनेकांचं ठरलेलं असतं. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित पार्ट्यांमध्येही लोणच्याची मागणी झपाट्याने वाढल्याचं मोश्मी पोवार यांनी सांगितलं.

Back to top button