News

विशाळगडावर नवीन प्रजातीच्या वनस्पतीचा शोध; दिले छत्रपती शिवरायांचे नाव | Ceropegia Shivarayina

कोल्हापूर | छत्रपती शिवरायांच खरं वैभव म्हणजे त्यांनी बांधलेले किल्ले आहेत. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेमधील असाच एक महत्वाचा किल्ला म्हणजे विशाळगड (Vishalgad) आहे. या गडावर आता एका नव्या प्रजातीच्या वनस्पतीचा शोध लागला आहे. शिवरायांप्रति कृतज्ञता अर्पण करण्यासाठी आता या नव्या प्रजातीला \’शिवरायीना\’ (Shivarayina) असं नाव देण्यात आलं आहे.

विशाळगड येथे शोधण्यात आलेल्या या वनस्पतीच्या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. ही वनस्पती कंदील पुष्प वर्गातील असून या नवीन प्रजातीचे सेरोपेजिया \’शिवरायीना\’ (Ceropegia Shivarayina) असे नामकरण करण्यात आले आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने प्रथमच एका वनस्पतीच्या प्रजातीला संबोधित केले जाणार आहे. याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञांकडून घेतली जाणार आहे. 

वनस्पतीशास्त्र विभाग न्यू कॉलेज, कोल्हापूर येथील अक्षय जंगम, रतन मोरे व डॉ. निलेश पवार तसेच चांदवड नाशिक येथील डॉ. शरद कांबळे आणि शिवाजी विद्यापीठ मधील प्रा. डॉ. एस. आर. यादव यांच्या चमूने विशाळगडावर कंदील पुष्प वर्गातील वनस्पतीचा शोध लावला आहे.  या नवीन प्रजातीचे सेरोपेजिया शिवरायीना असे नामकरण केले आहे. या माध्यमातून त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रति कृतघ्नता व्यक्त केली आहे. या संदर्भातील शोधनिबंध न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या फायटोटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला आहे.

शोधनिबंध आतंरराष्ट्रीय नियतकालिकात पाठवण्यात आला 

अक्षय जंगम व डॉ. निलेश पवार गेली सहा वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यावरील वनस्पतींचा अभ्यास करत आहेत. त्याअंतर्गत काम चालू असताना ऑगस्ट 2023 मध्ये विशाळगडावर कंदीलपुष्प वर्गातील एक वेगळी वनस्पती आढळली होती. भारतामधील कंदीलपुष्प वर्गाचे तज्ञ असणारे मूळचे कोल्हापूरचे पण सध्या नाशिक येथे कार्यरत असणारे डॉ. शरद कांबळे यांनी या वनस्पतीची सखोल पाहणी केली होती. यावेळी ही नवीन प्रजाती असण्याची शक्यता व्यक्त केली होती.

त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. एस. आर. यादव यांनी या सेरोपेजिया वर्गाला भारतभर एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. ज्यांनी आत्तापर्यंत या वर्गातील 6 नवीन प्रजाती शोधून काढल्या आहेत, त्यांनी अंतिम निरीक्षणानंतर सदर वनस्पती ही नवीन प्रजाती म्हणून घोषित होऊ शकते, यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यासंबंधी शोधनिबंध आतंरराष्ट्रीय नियतकालिकात पाठवण्यात आला आहे. सदर नवीन प्रजातीच्या अधिवासाचा विचार करता गडावर याची संख्या मर्यादित असली तरी आजूबाजूच्या डोंगररांगांमध्ये सुद्धा ही प्रजाती आढळू शकते अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचे कारण म्हणजे

या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचे कारण म्हणजे शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच सह्याद्रीमध्ये रोवली होती. स्वराज्य रक्षणात गडांचे त्याचबरोबर सभोवतालच्या जंगलांचे महत्व जाणले होते. गडकिल्ल्यांच्या माध्यमातून वनस्पतींसाठी जणूकाही संरक्षित क्षेत्रेच राखीव केली आहेत. एवढेच नव्हे तर आज्ञापत्रात रयतेसाठी \”गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ते झाडी प्रयत्ने वाढवावी त्यामध्ये येक काठी तेही तोडू न द्यावी असे आवाहन केले आहे.

यावरुन छत्रपती शिवराय जैवविविधता संवर्धनाच्या बाबत किती अग्रेसर आणि काटेकोर होते हे लक्षात येते. जवळजवळ तीन शतके गुलामगिरीच्या वरवंट्याखाली भरडलेल्या अंधारमय महाराष्ट्रात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या छत्रपती शिवरायांना कंदीलपुष्प कुळातील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला शिवरायांचे नाव देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आम्हाला मिळाली असे संशोधकांनी यासंदर्भात सांगितले.

Back to top button