कोपर्डे येथील दोन भावांचा शेतात विजेचा शॉक लागून मृत्यू | Kolhapur News
कोल्हापूर | शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे येथे दोन सख्ख्या भावांचा शेतात विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यु झालाय. कडवी नदीजवळील शेतात हे दोघेही तणनाशक मारण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना विजेचा शॉक लागल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. सुहास कृष्णा पाटील आणि स्वप्नील कृष्णा पाटील अशी सख्या भावांची नाव आहेत.
Kolhapur News: मिळालेल्या माहितीनुसार, सुहास आणि स्वप्नील हे दोन भाऊ भाताची रोपे लावल्यानंतर शेतात तणनाशक मारण्यासाठी गेले होते. तणनाशक मारत असताना सुहासला विजेच्या तारेचा धक्का लागल्याने तो शेतात पडला. भावाला काय झाले, हे पाहण्यासाठी स्वप्नील त्याच्या जवळ गेला असता त्यालाही विजेचा धक्का बसला. त्यामुळे दोघांचाही यात दुर्दैवी मृत्यू झाला.
दोन्ही मुले घरी का आली नाहीत, याची माहिती घेण्यासाठी वडील कृष्णा पाटील तिथे गेले असता दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी आरडाओरडा केल्यावर गावातील लोकांनी धाव घेतली. दोन्ही कर्त्या सवरत्या मुलांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेचा पंचनामा केल्यानंतर शाहूवाडी पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. आपली दोन्ही मुलं विजेचा शॉक लागून गेल्याची बातमी त्यांच्या आईला समजताच त्यांनी मोठ्याने टोहो फोडला. सुहासच्या पत्नीचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दोन्ही मुलांच्या मृत्यूनं संपूर्ण पाटील कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे.
सुहास आणि स्वप्निल पाटील यांचा गाडी सर्विसिंग सेंटरचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सांभाळत घरची शेतीची सांगड घालत दोघा भावांनी कुटुंबाला हातभार लावला होता. सुहासचे नुकतेच लग्न झाले होते. तो भावाला शेती आणि व्यवसायात मदत करत होता. मात्र, दोघांच्या दुर्दैवी मृत्यूने वडील कृष्णा पाटील यांच्यावर मुलांना अग्नी देण्याची वेळ आली आहे. या दुर्दैवी घटनेने शाहूवाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.