कोल्हापूरकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी 100 इलेक्ट्रिक एसटी बसेस धावणार! E Bus
कोल्हापूर | सध्या इलेक्ट्रिक व्हेईकलचा जमाना असून एसटी महामंडळात देखील मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बसेस दाखल होत आहेत. कोल्हापूरला देखील विजेवर चालणाऱ्या 100 बसेस (E Bus) लवकरच मिळणार आहेत. त्याची पूर्व तयारी म्हणून ताराबाई पार्क येथे चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. राज्य सरकारने यासाठी जवळपास 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
कोल्हापूरातील हे चार्जिंग स्टेशन येत्या तीन महिन्यांत तयार होणार आहे. ताराबाई पार्कात पूर्वी जेथे एसटीचा डेपो होता त्याच ठिकाणी हे चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे, हे चार्जिंग स्टेशन मध्यवर्ती बस स्थानकापासून जवळ आहे. यासाठी 9 कोटी 86 लाख 96 हजार 637 रुपये निधी मंजूर केला आहे. विजेवरील बसेसमुळे पर्यावरणाचे रक्षण होण्याबरोबर डिझेलच्या खर्चातही मोठी बचत होणार आहे. इंधन बचत आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हे पाऊल उचलले आहे.
परिवहन मंडळाच्या वतीने मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ई-बसेसची सेवा सुरू करण्यात आली आहे. या बसेसच्या चार्जिंगसाठी राज्यातील 10 एसटी स्थानकांमध्ये 50 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहेत. तसेच ई-बसेसना प्रवाशांकडून चांगली पसंती मिळत आहे.
कोल्हापुरात ताराबाई पार्क येथील एसटी कॉलनी आवारात ई बसेसच्या चार्जिंग स्टेशनसाठी स्वतंत्र डेपो व चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रकांनी दिली आहे.
ई बसेसच्या चार्जिंग पॉईंटसाठी 11, 22 व 33 के. व्ही. क्षमतेची उच्च दाबाची वीजजोडणी आवश्यक असते. एका बसला चार्ज होण्यासाठी सुमारे तीन तास लागतात. पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही बस 300 किलोमीटरचा टप्पा गाठते.
ई बसेस मिळाव्यात ही आपली खूप दिवसांपासूनची मागणी आहे. 100 बसेस कोल्हापूरला मिळणार आहेत. या बसेसच्या चार्जिंगसाठी ताराबाई पार्क येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. या चार्जिंग स्टेशनमध्ये 100 बसेसच्या चार्जिंगचे नियोजन करण्यात येईल.
– अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक