Kolhapur South Vidhan Sabha Election Result : कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीचा पहिला निकाल हाती आला आहे. आत्तापर्यंतच्या कलानुसार जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुफडासाफ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा पैकी नऊ जागांवरील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना घरचा रस्ता धरावा लागण्याची चिन्हे आहेत. सर्वच जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील आघाडीवर आहेत. ते सुद्धा भाजप बंडखोर उमेदवार असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडी पूर्णतः हद्दपार झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील यांना सर्वात मोठा धक्का बसला असून त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजपचे अमल महाडिक यांनी त्यांना पराभवाची धूळ चारत पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला निकाल कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये लागला आहे.
अमल महाडिक यांनी आमदारकी खेचून आणल्याने भाजपच्या गोटात जल्लोष सुरू असून महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरूवात केली आहे.