कोल्हापूर: शिवाजी पूल वाहतूकीसाठी बंद; वाहनधारकांचे हाल | Kolhapur Flood 2024
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली असून कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी-रजपूतवाडी दरम्यान पाणी आले आहे. यामुळे पोलिसांनी शिवाजी पुलावरील वाहतूक बुधवारी रात्री बंद केली आहे. अचानक शिवाजी पुलावरील वाहतूक बंद झाल्याने वडणगे, आंबेवाडी, चिखली आदी परिसरासह पुढे जाणार्या वाहनधारकांचे अतोनात हाल झाले.
यावेळी पुढे सोडण्यावरून नागरिक आणि पोलिस प्रशासनात वादावादी झाल्याचे देखील पहायला मिळाले. मात्र पोलिसांनी वाहने पुढे सोडली नाहीत. परिणामी अनेकजण कोल्हापुरातच अडकले तर काहींनी पुणे-बंगळूर महामार्गावरून शिये-निगवे-कुशिरे अशा मार्गाचा अवलंब करत घरी जाणे पसंत केले.
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर केर्ली ते कोतोली फाटा या दरम्यान मंगळवारी कासारी नदीचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. या मार्गावरील वाहतूक केर्ली-जोतिबा-दानेवाडी-वाघबीळ या पर्यायी मार्गे वळण्यात आली होती. आता आंबेवाडी-रजपूतवाडी दरम्यान कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पंचगंगेच्या पुराच्या पाण्याची पातळ वाढल्याने वाहतूक बंद करण्यात आली. तत्पूर्वी दिवसभर या पाण्यातूनच वाहतूक सुरू होती.
आंबेवाडी-चिखली मार्गावरही दोन ठिकाणी सकाळी पाणी आले. सायंकाळी त्याचीही पातळी वाढत गेली. चिखली-वरणगे मार्गावर प्रयाग येथील संगमस्थळावरील पूल आणि रस्ताही पाण्यात गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. वडणगेकडे जाणारा पोवार पाणंद रस्ता पाण्याखाली गेल्याने आंबेवाडी फाटा ते वडगणे या रस्त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू होती. या मार्गावरही सकाळपासून पाणी आले. त्याची पातळीही सायंकाळी वाढली आहे.