कोल्हापूर करांनो सावधान! यंदा पंचगंगेची पाणी पातळी 44 फूट असतानाच कोल्हापूरात शिरले पाणी, पाणी पातळी 3 फूट कमी असतानाच पाणी शिरल्याने चिंता वाढली
कोल्हापूर | कोल्हापूरातील 2019 आणि 2021 साली आलेल्या दोन महापुरांचा अनुभव पाहता जेव्हा पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 43 फूट होते, तेव्हाच पन्हाळा रस्त्यावर पाणी येते. परंतू यंदा यात मोठा फरक पडला असून राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 41 फुटांवर असतानाच पन्हाळा रस्त्यावर पाणी आले आहे.
कोल्हापूर शहरात देखील हीच परिस्थिती असून जेव्हा पंचगंगा 47 फूटांवर पोहचते तेव्हाच शहरात पाणी शिरायला सुरूवात होते. यंदा मात्र याउलट चित्र असून पंचगंगेन 44 फुटांची पातळी गाठताच शहरात पाणी घुसायला सुरवात झाली आहे. ही कोल्हापूरसाठी मोठी चिंतेची बाब असून आपत्ती व्यवस्थापन विभागही याचा अभ्यास करत आहे.
राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी जेव्हा 39 फूटावर असते तेव्हा ती इशारा पातळी मानली जाते. त्यामुळे पंचगंगेनी ही पातळी गाठताच प्रशासन अलर्ट मोडवर येते. यामुळे शहरात कोणत्या भागात कोणत्या पाणी पातळीला पाणी शिरणार हे यापूर्वी माहित होते. आधीच्या महापुराच्या पाणीपातळीच्या अभ्यासानुसार ही माहिती असल्याने सुतार मळा, शाहुपुरीतील कुंभार गल्ली, बापट कॅम्प, कसबा बावड्याकडील नदीकाठचा परिसर या सगळ्यांनी कधी घराबाहेर पडायचे हे ठरवलेले असते. चिखली, आंबेवाडीचे ग्रामस्थही यावरुनच निर्णय घेतात.
परंतू यावेळी राजाराम बंधाऱ्यावर 41 फुटांवर पाणीपातळी असतानाच कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर पाणी आले आहे. तर कोल्हापूर शहरात 44 फूटांवरच पाणी शिरायला सुरूवात झाली आहे. याच अंदाजाने जो राष्ट्रीय महामार्ग याआधीच्या महापुरावेळी 50 फुटांची पाणीपातळी असताना बुडत होता तो आता 48 फुटांच्या पातळीवरच बुडण्याची जास्त शक्यता आहे.
राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर 14 तासांनी हे पाणी कोल्हापुरात पोहोचते. त्यामुळे राधानगरी धरणातून आलेल्या पाण्याचा नेमका परिणाम दुसऱ्या दिवशीपासून दिसण्यास सुरूवात होते. सध्या जिल्ह्यासह शहर परिसरात देखील पावसाचा जोर कायम असल्याने राधानगरी धरणाचे पाणी कोल्हापूरात पोहचण्याआधीच पाणी पातळी वाढताना दिसत आहे. आता राधानगरी धरणाचे पाणी पोहचल्याने यात आणखी मोठा फरक पडणार आहे.
कारणे काय..?
कोल्हापूरात महापूर आला, नुकसान झाले की मगच ब्लू लाईन, रेडझोन अशा बाबींची आठवण येते. याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरते. त्यावर चर्चाही झडतात. तावातावाने बोलले जाते. परंतू पूर ओसरला, पाणी कमी झालं की हे सगळं कुणालाच आठवत नाही. त्यामुळे नदीपात्रालगत भराव टाकून मजल्यांवर मजले चढवले जातात, टोलेजंग इमारती उभारल्या जातात. मुरुमांचे ढिग ओतून रस्त्यांची उंची वाढवली जाते. परिणामी पाण्याचा निचरा करणारे नैसर्गिक स्त्रोत बंद होऊन पूरपरिस्थितीला आमंत्रण दिले जाते. महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी हे सगळं डोळं झाकून पाहतात, कारण यासाठी त्यांचे हात आधीच ओले झालेले असतात.